शिक्रापूर, (वार्ताहर)- करंदी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांच्या ज्ञानात भर पडावी तसेच मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले. मुलांनी एकशे दहा दुकानांच्या माध्यमातून तब्बल ऐंशी हजार रुपयांची उलाढाल केली असल्याची माहिती मुख्याध्यापक गौतम गायकवाड यांनी दिली आहे.
करंदी येथील शाळेत आनंदी बाजाराचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुलींनी शेतकऱ्यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा साकारून भाजीपाला तसेच खाऊ आणि सर्व गरजेच्या वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या. अनेकांनी स्वतःच्या शेतातील भाजीपाला देखील बाजारात आणला.
मसाल्याचे पदार्थ, डाळी, आईस्क्रिम, ज्यूस, कडधान्य, मातीची भांडी, पाणीपुरी, भेळ, इडली, चहा, फळे, वेगवेगळ्या प्रकारचे खमंग खाद्यपदार्थासह शालोपयोगी वस्तूंनी हा बाजार मुलींनी नटविला होता.
यावेळी पालकांनी गर्दी केली होती. मुलांच्या या बाजाराला उपसरपंच नितीन ढोकले, पोलीस पाटील वंदना साबळे, सोमनाथ कदम, अंकुश पंचमुख, कैलास ढोकले, अशोक शेळके, सागर टाकळकर, विजय दरेकर आदींनी भेट देऊन मुलांचे कौतुक केले आहे. मुख्याध्यापक गौतम गायकवाड यांसह सर्व शिक्षकांनी आनंदी बाजार यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.