श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – जामखेड-शिक्रापूर महामार्गावर आढळगाव शिवारात गुरुवारी सकाळी एसटी आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात गौतम जयवंत छत्तीसे (वय. ४१ रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) हे जागीच ठार झाले. अपघातानंतर संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला.
आढळगाव ते जामखेड दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. येथील डोकेवाडी फाट्यावरुन अवजड वाहनांची वाहतूक हिरडगाव, शिंदा, बिटकेवाडी मार्गे वळविली आहे. त्यासाठी डोकेवाडीफाट्यावर रस्त्यावर मुरुमाचा मोठा भराव टाकला आहे.
गुरुवारी सकाळी जामखेडवरून पुण्याच्या दिशेने जाणारी एसटी बस ( ए एच ११ बी एल ९२३९) तसेच आढळगावातून भावडीच्या दिशेने निघालेली दुचाकी ( एम एच १२ सी एक्स ७२४०) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील गौतम छत्तीसे यांस डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाला. एसटी चालकावर अपघाताचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे