नारायणडोहो, (प्रतिनिधी) – नगर- सोलापूर महामार्गावर दहिगाव (ता.नगर) जवळ भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने पुढे चाललेल्या सायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने सायकलवरील ७० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुपारी ३ च्या सुमारास घडली. बबन मारुती हिंगे (वय ७०, रा. शिरढोण, ता.नगर) असे मयताचे नाव आहे.
मयत हिंगे हे कामानिमित्त शिरढोण येथून दहिगावकडे सायकलवर नगर-सोलापूर महामार्गाने जात होते. दहिगाव गावाजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने ( एमएच १२ के एन २२२१) त्यांना जोराची धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडून गंभीररित्या जखमी झाले. त्यांना परिसरातील नागरिकांनी व त्यांचा भाचा महेश सिद्धेश्वर वाघ याने नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले,
मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. मयत हिंगे यांच्या पश्चात पत्नी, सून, नातवंडे असा परिवार आहे. मयत हिंगे यांच्या एकुलत्या एक मुलाचे दीड महिन्यापूर्वीच अकाली निधन झालेले आहे, त्यानंतर त्यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबात कर्ता पुरुषच राहिलेला नाही.
त्यामुळे शिरढोण गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान अपघातानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला होता. मात्र, नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.