जलालखान पठाण
वाठार स्टेशन – पिंपोडे बुद्रुक, (ता. कोरेगाव) येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या संमिश्र व्यवसायाने ११०० कोटींवर झेप घेतली असून (सोमवारी) दि. १ जानेवारीला संस्थेचा ३४ वा वर्धापनदिन साजरा होत आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी दिली.
मुख्यालयातील पत्रकार परिषदेत त्यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेतला. यावेळी लेंभे बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई व उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे कोल्हापूर असे विस्तारित कार्यक्षेत्र असणाऱ्या या संस्थेच्या एकूण ५२ शाखा व आठ विभागीय कार्यालये आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही ग्राहकांना तत्पर सेवा दिली. गतिमान कामकाज केले.
ग्राहकांचा विश्वास हेच आमचे संचित असल्याचे नमूद करून लेंभे म्हणाले, ३१ डिसेंबर २०२३ अखेर संस्थेकडे २७ कोटी २५ लाख रुपयांचे भागभांडवल, ७१ हजार ८२५ सभासद, ६२० कोटी ५१ लाख रुपयांच्या ठेवी, ४८० कोटी ६८ लाखांचे कर्जवाटप असून १७० कोटींची सुरक्षित गुंतवणूक करण्यात आली आहे. संस्थेचा नफा दोन कोटी ७० लाखांवर पोचला आहे. तर एकूण संमिश्र व्यवसायाने ११०० कोटींवर झेप घेतली आहे. एकूण कर्जाच्या ३५ टक्के १६८ कोटी रुपयांचे सुरक्षित सोनेतारण कर्ज असून बँकेप्रमाणे सक्षमपणे काम करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना मोबाईल बॅंकींग सुविधा देण्यात आली आहे.
स्वतःचे मोबाईल अँप, क्यूआर कोड व युपीआय कोड सुविधा, एसएमएस बँकिंग, पिग्मी अँप, सर्व शाखांमधून आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस सुविधा उपलब्ध आहेत. १३ पतसंस्थांचे विलीनीकरण करून आर्थिक अडचणीत सापडलेल्या ठेवीदारांना न्याय दिला आहे. ५२ पैकी निम्म्या शाखा ग्रामीण भागात आहेत. दुष्काळसदृष्य परिस्थितीतही कर्ज वसुलीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, उपाध्यक्ष श्रीकांत शेटे, सर्व संचालक, अधिकारी व सेवकांमुळे संस्था यशशिखरावर पोचली आहे.
वर्धापनदिनानिमित्त मुख्यालयात सत्यनारायण पूजा व ग्राहक मेळावा आयोजित केला असून सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक लेंभे यांनी आभार मानले.