पुणे – पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने वाचन संस्कृती वाढण्यासाठी भारताने संलग्न चौथा विश्वविक्रमाची नोंद गुरुवारी करण्यात आली. या विश्वविक्रमांतर्गत ११ हजार ४३ नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद ३० सेकंदात वाचण्याचा नवा विश्वविक्रम गिनेस बुक ऑफ रेकोर्डमध्ये नोंदवला आहे. यापूर्वी, असा रेकॉर्ड चीनच्या नावावर होता. या महोत्सवाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा चीनचा रेकॉर्ड मोडण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने विश्वविक्रमात पुन्हा एकदा भारताने चीनला मागे टाकले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या शृंखलेत चौथा विश्वविक्रम नोंदवण्यात आला. यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ कवयित्री अरूणा ढेरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, डॉ. आदित्य अभ्यंकर, प्रकाशक राजीव बर्वे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, सुनिताराजे पवार, मिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते.
हा विश्वविक्रम लार्जेस्ट ऑनलाइन अल्बम ऑफ पीपल रिडींग सेम पॅराग्राफ ऑफ मिनीमम ड्यूरेशन ऑफ ३० सेकंड या विषयावर नोंदविण्यात आला आहे. गिनेस बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी स्वप्निल डांगरिकर यांनी विश्वविक्रमाची घोषणा केल्यानंतर, उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांनी जल्लोष केला. पुणे पुस्तक महोत्सवाला सहकार्य करणाऱ्या मधुमिलन मेहेंदळे, राजीव बर्वे, सुनिताराजे पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांकडून परिच्छेद वाचून घेऊन व्हिडिओ तयार करण्यात येत आहेत. तसेच राज्यभरातून नागरिक व्हिडिओ पाठवले आहेत. हा परिच्छेद हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवादित करण्यात आल्याने देशभरातून आणि परदेशातूनही व्हिडिओ आले आहेत, असे प्रा. आदित्य अभ्यंकर यांनी सांगितले.
‘पक्षी उन्हाचा यावर आज चर्चा
पुस्तक महोत्सवात साधना प्रकाशनाच्या राजन हर्षे लिखित ‘पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात’ या पुस्तकावरील चर्चेचा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला. आयोजकांनी ऐनवेळी कार्यक्रम रद्द केल्याचा आरोप साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी याचा निषेध नोंदवला. आयोजकांनी घेतलेल्या निर्णयाचा निषेध करून हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. २२) सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभागृहात घेण्यात आल्याचे शिरसाठ यांनी सांगितले.
दरम्यान, साधना प्रकाशनाने महोत्सवात कार्यक्रम करण्यासंदर्भात संयोजन समितीशी संवाद साधलेला नाही. ज्या वेळी ही माहिती कळाली, तेव्हा कोणताही स्लॉट उपलब्ध नव्हता. या प्रकाशन संस्थेचा पुस्तकांचा एक स्टॉल प्रदर्शनात समाविष्ट आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी दिली.