मध्य प्रदेश : पाच राज्यांच्या निवडणूकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातील छत्तीसगड आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान पार पडले. तर तिकडे मध्य प्रदेशात देखील भाजपने सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रचार केला आहे. शिवपुरी जिल्ह्याच्या पोहरी विधानसभेत निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार सुरेश धाकड राथखेडा हे जनतेकडे मतांची भीक मागताना दिसून आले.
पोहरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश धाकड राठखेडा म्हणाले की, ‘मी तुमच्याकडे भीक मागतो. माझ्यासारख्या एका गरिब शेतकऱ्याच्या मुलाला महाराज ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री मामा यांनी वल्लभ भवनमध्ये पोहोचवलं. त्यामुळे, माझी लाज राखा, मला मतदान करा आणि १७ नोव्हेंबरला कमळाच्या बटणावर मतदान करा,” अशी विनंती मंत्री सुरेश धाकड यांनी केली.
भाजपचे उमेदवार सुरेश धाकड राथखेडा येथे रडून मत मागतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, पोहरी विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून शिंदे समर्थक मंत्री सुरेश धाकड राथखेडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथे भाजप, काँग्रेससह बसपाचाही उमेदवार उभा आहे.येथे तिहेरी लढत होताना दिसणार आहे.
यादरम्यान,मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हेही मंचावर उपस्थित होते. शिवराज सिंह यांनीही येथील सभेला संबोधित करताना वीजेच्या बिलात माफी देत असल्याची घोषणा केली. तसेच, गरीब व मध्यमवर्गीयांना केवळ ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देण्यात येईल, असेही आश्वासन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि कमलनाथ यांच्या मागील सरकारवरही जोरदार निशाणा साधला.