नवी दिल्ली – भारतामध्ये विमा उतरविणाऱ्यांची संख्या वेगात वाढविण्यासाठी विमा नियंत्रकांनी ( आयआरडीए) विमा कंपन्यांना आरोग्य आणि सर्वसाधारण विमा उत्पादने नियंत्रकाच्या परवानगीशिवाय सादर करण्यास परवानगी दिली आहे.
जवळ जवळ सर्व आरोग्य विमा उत्पादने आणि सर्वसाधारण विमा उत्पादने यामुळे विमा कंपन्यांना परवानगीची वाट न पाहता सादर करता येतील.
या प्रक्रियेला युज अँड फाईल असे संबोधले जाते. विमान कंपन्यांना उद्योग करणे सुलभ व्हावे याकरिता हा पुढाकार घेण्यात आला आहे. सध्या नियंत्रकाची परवानगी असल्याशिवाय विमा कंपन्यांना आपली उत्पादने जनतेला सादर करता येत नाहीत.
मात्र आता आपली उत्पादने सादर करून विमा कंपन्या नियंत्रकाकडे परवानगीसाठी प्रक्रिया सुरू करू शकतात. यामुळे विमा कंपन्या नावीन्यपूर्ण उत्पादने जनतेला कमीत कमी वेळामध्ये उपलब्ध करू शकतील. या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना बजाज आलियांझ जनरल इन्शुरन्स या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तपन सिंघल यांनी सांगितले की, विमा नियंत्रकांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरु केल्यामुळे विमा कंपन्यांना नावीन्यपूर्ण उत्पादने वेगात उपलब्ध करता येतील.
विमा उत्पादने जनतेला उपलब्ध करण्याबरोबरच विमा नियंत्रकाकडे परवानगी मागितली जाईल. सध्या अगोदर परवानगी घेऊन उत्पादने सादर करावी लागतात. त्यामुळे बराच वेळ वाया जातो. यासंदर्भात विमा कंपन्यांनी फारसा आग्रह धरला नव्हता तरीही विमा नियंत्रकांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमा कंपन्यांचा कारभार वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर जनतेला विमा उत्पादने उपलब्ध होतील. भारतामध्ये विमा काढणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. या उपक्रमामुळे भारतातील विमा काढणाऱ्यांची संख्या वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.
आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती वेगाने बदलत असते. त्या आधारावर विमा कंपन्यांना नवी उत्पादने सादर करावी लागतात. ही उत्पादने अगोदर सादर करून परवानगीसाठी वाट पाहिल्यानंतर बराच वेळ जातो. या नव्या निर्णयामुळे आता विमा क्षेत्रातील कंपन्यांचा बराच वेळ वाचणार आहे. त्याचा फायदा या विमा कंपन्यांबरोबरच भारतातील ग्राहकांना होणार आहे. कारण त्यांना बदललेल्या परिस्थितीच्या आधारावर उपयोगी पडणारी विमा उत्पादने लवकर मिळण्यास मदत होणार आहेत.