मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. सल्लागाराला नियमबाह्य पद्धतीने अधिक रक्कम देण्यात आली असून कॅगनेही त्यावर ताशेरे ओढले आहेत, असा दावा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. मुंबई महानगर पालिका ठरवून बनावाबनवी आणि गोंधळाची स्थिती करत आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रोजेक्ट बाबत मुंबईत चाललं काय? असा सवाल करतानाच महापालिकेने कोस्टल रोडच्या सल्लागारांना अधिक रक्कम दिली आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे.
6 सप्टेंबर 2021 आणि 2 ऑक्टोबर 2021 रोजी मी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी कोस्टल रोड प्रकल्पात भ्रष्टाचार होत असल्याचे मी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र आजही या प्रकल्पात अनागोंदी आणि अफरातफरी चालू आहे, असे ते म्हणाले.
प्रकल्प व्यवस्थापक असलेल्या कन्सल्टंटला कुठे ना कुठे बेकायदेशीर मदत केली जात आहे. त्यांना जास्तीचा पैसा दिला जात आहे. वेगवेगळ्या पॅकेजमधील तीन कंत्राटदार आहेत. त्यांना अवास्तव बिले दिली जात आहेत. मी जेव्हा आरोप केले होते. तेव्हा पालिकेने असं काही नसल्याचं म्हटले होते. तसे लिखीत उत्तर पालिकेने दिले होते. माझ्याकडे पुरावे आहेत. 23 एप्रिल 2021चा सीएजी रिपोर्ट आहे.
महापालिकेने 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2020 दरम्यान केलेल्या कोस्टल रोडच्या कामावर कॅगने या अहवालात ताशेरे ओढले आहेत. पालिकेकडून बेकायदेशीर बिले दिली जात आहेत. कंत्राटदारांना विशेष मदत केली जात आहे. मुंबईकरांच्या पैशाची लूट केली जात आहे. हा सर्व भ्रष्टाचार आहे. बनवाबनवी आहे. त्यावेळी मी 1600 कोटीचा तवंग समुद्राच्या पाण्यावर येत असल्याचे म्हटले होते. त्याचं एक पान कॅगने खोलले आहे, असे शेलार यांनी सांगितले.