काबुल – तालिबानने हेरात प्रांतातील सरकारी आणि खासगी विद्यापिठांमध्ये मुले आणि मुलींच्या एकत्रित शिक्षणावर बंदी घातली आहे. मुलींचा शिक्षणाचा हक्क जपण्याची भाषा करत असतानाच एकत्रित शिक्षणामुळेच सर्व समस्या निर्माण होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या प्रांतातील विद्यापीठांतील प्राध्यापक, खासगी शिक्षण संस्थांचे मालक, आणि तालिबानी अधिकाऱ्यांमध्ये आज बठक झाली. त्यावेळी या निर्णयाचा फतवा काढण्यात आल्याचे वृत्त आहे. तालिबानने गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर काढण्यात आलेला हा पहिलाच फतवा आहे.
मंगळवारी तालिबानचा प्रवक्ता झबिबुल्लाह मुजाहिद याने घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत महिलांच्या शिक्षणाच्या अधिकाराचे इस्लामिक कायद्याच्या आधीन राहून रक्षण केले जाईल, असे सांगितले होते.
शिक्षण संस्थांचे प्रमुख आणि तालिबानी म्हरक्यांमध्ये सुमारे तीन तासांची चर्चा झाली होती. त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत सहशिक्षण चालू दिले जाणार नाही, अशी भूमिका तालिबानचा प्रतिनिधी मुल्ला फरीद याने घेतल्याचे समजते आहे. सद्गुणी प्राध्यापक महिलांना केवळ मुलींना शिक्षण देता येऊ शकेल. मात्र त्या मुलांना शिकवू शकणार नाहीत. समाजातील सर्व दुर्गुणांचा पाया हा या सहशिक्षणामध्येच आहे, असेही या प्रवक्त्याने सांगितले.