पुणे – करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शनिवारी शहरातील सक्रिय बाधित संख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला. तर, गेल्या 24 तासांत नव्याने 1 हजार 633 करोनाबाधित सापडले, तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापालिका आरोग्य विभागाकडून चाचण्यांची संख्या वाढवली आहे. दिवसभरात तब्बल 9 हजार 762 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली.
आतापर्यंतची ही सर्वाधिक चाचणी संख्या आहे. तर, मार्च 2020 ते 13 मार्च 2021 पर्यंत 12 लाख 39 हजर 264 संशयितांच्या तपासणीमध्ये 2 लाख 16 हजार 463 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मागील आठ दिवसांत सक्रिय आणि अत्यवस्थ बाधितांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
जानेवारीच्या अखेरीस दीड ते दोनपर्यंत खाली आलेली ओक्सिजनवरील बाधित संख्या 755 वर पोहोचली आहे. तर, सक्रिय बाधित संख्या 10 हजार 723 इतकी आहे. त्यातील 351 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.