नगर -कुष्ठधाम रस्त्याचे भाग्य अखेर उजळले असून, रस्त्यातील विद्युतीकरणासाठी तब्बल दोन कोटी 30 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे त्यासंदर्भात आमदार जगताप यांनी प्रस्ताव दिला होता. त्यातून हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दैनिक प्रभातमधून या रस्त्याच्या गचाळ कामासंदर्भात डिसेंबर महिन्यात मालिकाच प्रकाशित करण्यात आली होती. तोफखाना पोलीस ठाणे ते भिस्तबाग महालापर्यंतचा हा रस्ता साधारण तीन किलोमीटर लांबीचा आहे. नकाशाप्रमाणे तोफखाना पोलीस चौकी ते गुलमोहर रोड कॉर्नरपर्यंत पहिल्या टप्प्यात 20 मीटर, तेथून पुढे भिस्तबागपर्यंत 18 मीटर व तेथून पुढील भागात भिस्तबाग चौक ते महालापर्यंत हा रस्ता 15 मीटर नकाशाप्रमाणेच भरायला हवा. तथापि, त्यात साधारण तीन मीटरची तफावत आहे.
त्याशिवाय रस्त्यातील विजेचे खांब तसेच ठेवून रस्त्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्त्यातील अडथळा कायम आहे. त्यातून रहदारीच्या अडचणी कमी होणार नाहीत. सबब, विजेचे पोल एका बाजूला हटवावेत, अशी मागणी सावेडीतील नागरिकांनी केली होती. माजी नगरसेवक तायगा शिंदे व नगरसेविका सोनाबाई शिंदे यांनी काही मागण्या करत रस्त्याचे काम बंद पाडले होते. ड्रेनेजलाइनचे काम रस्त्याच्या कडेलाच व्हायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली होती. सोनानगरपूर्वीच्या भागातील ड्रेनेजलाइन नव्याने करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या भागातील ड्रेनेजलाइन नव्याने व रस्त्याच्या कडेलाच कराव्यात. त्यातून भविष्यात रस्ता पुन्हा-पुन्हा खोदाई करण्याची वेळ येणार नाही, अशी सूचना शिंदे यांनी केली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निधीची मागणी केली होती. या रस्त्यात विद्युतीकरण भूमिगत करण्यासाठी आग्रह केला होता. त्या मागणीची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्काळ दखल घेवून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निधीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यानुसार हा निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच रस्त्यातील विजेचे खांब हटविले जातील. त्यातून रस्त्यातील अडथळेही दूर होतील. मात्र, यापुढे विकासकामांत कोणी राजकारण करु नये. सावेडी उपनगरासाठी कुष्ठधाम रस्ता ‘मॉडेल’ रस्ताच असेल, यासाठी माझा प्रयत्न आहे, असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं आहे.