लक्ष्मीनगर येथे 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

आळंदी : लक्ष्मीनगर (चऱ्होली खुर्द) येथील अंगणवाडी परिसरात भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात लष्कर जवान नितीन थोरवे आणि माजी सैनिक दुर्गादास इंगळे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत आणि ध्वजगीताने उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली.
कार्यक्रमात विशाल घरजाळे, भागवत जाधव, ज्ञानेश्वर बोरूडे महाराज, सीआरपी स्वप्नजा फुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व आणि देशासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संदेश दिला. विशेषतः लष्कर जवान नितीन थोरवे यांनी सादर केलेल्या शौर्यगीताने उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यामुळे लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव पांचाळ यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. त्यांच्या समर्पक निवेदनाने कार्यक्रमाला शिस्तबद्धता आणि उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झाले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या अर्चना थोरवे, धनंजय थोरवे, शिवाजी धुळगंड, ज्ञानेश्वर पगडे, सिद्धेश्वर पगडे, अर्जुन थोरवे, हबीब भाई, किरण मोटकर, सीआरपी रविना थोरवे, जयश्री पवळ, मिरा डोंगरे, शिवाजी चव्हाण, अंगणवाडी सेविका मंदाकिनी कुंभार, मदतनिस प्राजक्ता खरोटे, विद्यार्थ्यांचे पालक यांच्यासह लक्ष्मीनगर, पुण्यभूमी, ज्ञानेश्वर पार्क आणि विश्रांतीवड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी एकजुटीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
हा कार्यक्रम नागरिक, लहान मुले आणि मान्यवरांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे अविस्मरणीय ठरला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशप्रेम आणि एकतेचा संदेश देणारा हा सोहळा लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.







