नगर, (प्रतिनिधी) – हिंद सेवा मंडळाकडे भाडेपट्ट्याने ताब्यात असलेली मिळकत ही तकिया ट्रस्टची आहे की वक्फ बोर्डाची आहे. तिच्या मालकीहकाशीवर बेकायदेशीर कामकाजाचा आरोप करत आहे. व हिंद सेवा मंडळ आणि कार्यकारी मंडळाची बदनामी केल्याप्रकरणी ५० लाखाच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे मंडळाचे कार्याध्यक्ष अनंत फडणीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, संजय जोशी आदी उपस्थित होते. हिंद सेवा मंडळाच्या ताब्यातील जागेसंदर्भात सभासद वसंत लोढा, दीप चव्हाण आणि संजय घुले यांनी पत्रकार परिषद घेत कार्यकारी मंडळावर विविध आरोप केले होते. त्यास कार्याध्यक्ष फडणीस यांनी सडेतोड उत्तर दिले. मंडळाच्या निवडणुका, कामकाज कायदेशीर पद्धतीने सुरू असून, धर्मदाय आयुक्त, उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आतापर्यंतची कार्यप्रणाली सुरू आहे.
त्यामुळे बेकायदेशीर कामकाजाचा आरोप करून मंडळाचे कामकाज विस्कळीत करण्याचा हेतू लोढा आणि चव्हाण यांचा असल्याचा आरोप ही त्यांनी केला. सदरची प्रॉपटी ही मंडळाने भाडेपट्ट्याने घेतली होती. तिचा मालकीहक कोणाकडे आहे, याच्याशी मंडळाचा संबंध नाही. आम्ही भाडेकरू असून तिचा २५ कोटी रुपयात ताबा सोडण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे, असे फडणीस यांनी सांगितले.