Pune News : पुण्यासाठी ५ नवीन पोलीस ठाण्यांना लवकरच मान्यता : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

पुणे : पुणे शहराच्या वाढत्या विस्तारासोबत कायदा व सुव्यवस्था सुदृढ ठेवण्यासाठी राज्य शासनाचा विशेष भर आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की, “६० वर्षांनंतर पोलीस दलाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. यामध्ये आधुनिक पोलीस ठाण्यांची रचना, नार्कोटिक्स आणि फॉरेन्सिक युनिट्स यांचा समावेश आहे. लोहगाव, लक्ष्मीनगर, नऱ्हे, मांजरी व येवलेवाडी येथे नवीन पोलीस ठाण्यांच्या स्थापनेस लवकरच मंजुरी दिली जाईल. त्यासाठी एक हजार नवीन मनुष्यबळाचीही भर घालण्यात येईल.”
उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर: उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त अमितेश कुमार व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुण्याच्या सुरक्षेसाठी आधुनिक पावले
शहरात अत्याधुनिक ‘दृष्टी’ इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, ड्रोन सुविधा, मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन, तसेच सीसीटीव्हीच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला. बोपदेव घाटासह शहरातील २२ टेकड्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी ठेवण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आणि २४x७ नियंत्रणासाठी पाच मोबाईल कंट्रोल युनिट्सही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.





