Pimpri News | शहर विकास की ‘राजकीय’ आराखडा? डीपीबाबत अजित पवार गट आक्रमक!

प्रभात वत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिध्द केलेल्या प्रारूप सुधारित विकास आराखड्यात (डीपी) अनेक चुका आहेत. चुकीच्या पद्धतीने आरक्षणे टाकत भूमिपुत्रांवर अन्याय करण्यात आला आहे. हा आराखडा रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे गुरुवारी (दि.७) महापालिका भवनावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. पिंपरी शगुन चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा घोषणाबाजी करत पुणे-मुंबई महामार्गावरून महापालिका मुख्यालयावर धडकला. दरम्यान, या मोर्चामध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे असतानाही प्रशासनाने या मोर्चाची साधी दखल ही घेतली नसल्याने विधानसभा उपाध्यक्षांचा अपमान केला असल्याचा आरोप होत आहे.
या आंदोलनात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, शाम लांडे, डब्बू आसवाणी, पंकज भालेकर, मयूर कलाटे, वैशाली घोडेकर, फजल शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी नागरिकांनी विविध प्रकारच्या आरक्षणांवर प्रशासनाचा तीव्र निषेध केला. नागरिकांनी निषेध म्हणून आरक्षणांचे फलक फाडले. मोर्चा पूर्णतः शांततेत पार पडला.
महापालिका मुख्यालयावर पोहोचल्यावर प्रशासनाविरुध्द पायर्यांवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. हा डीपी रद्द करून नव्याने सुसंगत, जनतेशी सल्लामसलत करून आराखडा तयार करा, अशी मागणी करण्यात आली. मात्र, मागण्याचे निवेदन घेण्यासाठी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तथा कोणताही वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे हा उपाध्यक्षांचा अपमान असल्याचा आरोप करत शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे स्पष्ट केले.
शहराध्यक्ष योगेश बहल यांनी विकास आराखड्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, सध्याचा डीपी प्लॅन चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आला आहे. त्यात बेकायदेशीर आरक्षणे असून, विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या भावना पायदळी तुडवल्या जात आहेत. भीमसृष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात पोलीस आयुक्तालय व बस टर्मिनससाठी ठेवलेले आरक्षण तत्काळ मागे घ्यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. त्यांनी संपूर्ण डीपी व टीपी आराखडा रद्द करून नव्याने, जनतेशी सल्लामसलत करून आराखडा तयार करण्याचे आवाहन केले.
आयुक्त शहाराचे भाग्यविधाते नाही..
दरम्यान, निवेदन स्वीकारण्यासाठी आयुक्त शेखर सिंह उपस्थित नसल्याने उपाध्यक्ष बनसोडे यांनी त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘आयुक्त शेखर सिंह हे या शहराचे भाग्यविधाते नाहीत. ते आज निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नाही हे आमचे दर्देव आहे. या शहराचा विकास अजित पवार यांनी केला असून तेच या शहराचे भाग्यविधाते आहेत, हे आयुक्तांनी विसरू नये. मी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडे देणार आहे. तसेच आयुक्तांच्या या प्रकरणाची चौकशी देखील करायला सांगणार आहे.’’





