राजगुरूनगर (पुणे) – चांडोली (ता. खेड) येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड ऑक्सिजन बेड सेंटरचा शुभारंभ आमदार दिलीप मोहिते पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 9) करण्यात आले.
खेड तालुक्यात करोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने त्या प्रमाणात रुग्णांना सेवा उपलब्ध करण्याची मागणी गेली काही दिवसांपासून होत होती. तालुक्यात सुसज्ज ऑक्सिजन बेडची सेवा प्रशासकीय पातळीवर चांडोली येथे संपूर्ण ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर इमारतीत सुरु करण्यात आले आहे. 45 खाटांचे ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले असून 20 रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. यावेळी प्रांतअधिकारी संजय तेली, चांडोली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधव कणकवले, आरोग्य अधिकारी डॉ. दीपक मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, उपाध्यक्ष सुभाष होले उपस्थित होते.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधव कणकवले यांनी सांगितले रुग्णवाहिकाबाबत कार्यवाही झाली असून लवकरच ताब्यात मिळतील. व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध आहेत. ते चालवण्यासाठी आवश्यक कौशल्य असलेले वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाले नाही. खासगी तज्ज्ञ डॉक्टराकडे विचारणा केली आहे. व्हेंटिलेटर सेवा लवकरच उपलब्ध केली जाईल.
चांडोली येथील ग्रामीण रुग्णालय आता करोना रुग्णांसाठी राखीव झाले आहे. तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक कर्मचारी, डॉक्टर सेवा देण्यास सज्ज ठेवण्यात आली आहे. याबाबत नागरिकांना 24 चांगली तास सेवा उपलब्ध होईल, याबाबत आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी. महिलांसाठी बाळंतपणासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून दक्षता घेण्यात यावी. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत उपचार न मिळण्याबाबत तक्रारी आल्या तर गय केली जाणार नाही.
-निर्मला पानसरे, जिल्हा परिषद अध्यक्षा