सातारा, (प्रतिनिधी)- सातारा नगरपालिका आर्थिक वर्ष 2024- 25 मधील प्रस्तावित करभरणा प्रक्रियेच्या तयारीला लागली आहे. या वेळेचे उद्दिष्ट 42 कोटी रुपये असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सातारा शहराच्या हद्दवाढीतील 65 हजार मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. यावेळी शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट पालिकेच्या वसुली विभागाने ठेवले आहे.
सातारा पालिकेने गेल्या आर्थिक वर्षात 37 कोटी 41 लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. सातारा पालिकेच्या वसुली विभागाने 32 कोटींची वसुली केली. ही वसुली ८० टक्के होती. उर्वरित थकबाकी वसूल करण्याबरोबरच यंदाच्या करवसुलीसाठी पालिका सज्ज झाली असून वसुली विभाग त्या कामाला लागला आहे. वसुली विभाग अधीक्षक नीता फडतरे यांनी याची माहिती दिली.
त्यानुसार वसुली विभागाने नव्याने तयार करण्यात येणाऱ्या नवीन करमागणी नोटीसा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यंदाचे उद्दिष्ट 42 कोटींचे उद्दिष्ट राहण्याची शक्यता आहे. करवसुलीच्या नोटीसा तयार झाल्यानंतर त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी भाग लिपिक व त्यांच्या सहकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. नोटीसा बजावत असतानाच मिळकतधारकांना सुरू असणाऱ्या आर्थिक वर्ष 2024- 25 मधील प्रस्तावित करभरणा तात्काळ करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
करमागणीच्या नोटिसा बजावल्यानंतर नागरिकांना घरबसल्या कराचा भरणा करता यावा यासाठी बारकोड, पॉस मशीन व ऑनलाइन करभरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या वेळची वसुली का रखडली, याचा शोध घेऊन यंदा 100 टक्के वसुली करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने तयारी पूर्ण झाल्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकांच्या तयारीमध्ये सातारा पालिकेचे 40 टक्के मनुष्यबळ व यंत्रणा गुंतली होती. त्यामुळे वसुली विभागावर ताण पडला होता. मात्र, लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्या प्रक्रियेनंतर सातारा शहराच्या हद्दीतील 65 हजार मिळकतधारकांना या वर्षाच्या घरपट्टीच्या नोटीसा पाठवल्या जाणार असल्याची चिन्हे आहेत