जिल्ह्यातील 30 लाख नागरिकांना मिळणार धान्य

नगर -केंद्र सरकारने देशातील 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना वर्षभर मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. करोना संकटाच्या काळात घेतलेल्या या निर्णयाला सरकारने वेळोवेळी मुदतवाढही दिली आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लोकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा लाभ नगर जिल्ह्यातील 30 लाख नागरिकांना होणार असून साधारण 47 हजार मेट्रिक टन धान्याचे वाटप केले जाणार आहे.
गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य सरकारतर्फे गेल्या काही वर्षांपासून रेशनचे धान्य वितरित करण्यात येते. त्यासाठी स्वस्त धान्य दुकानात दरमहा धान्य गहू, तांदुळ, साखर, वाटप केले जात होते. केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून प्रतिकिलो तीन रुपये दराने तांदूळ, दोन रुपये दराने गहू, व एक रुपया दराने भरडधान्य उपलब्ध करून दिले जाते. त्यानुसार राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा स्वस्त धान्य वाटप केले जात आहे.
जिल्ह्यातील जवळपास 29 लाख 52 हजार 852 गोरगरीब जनतेला दरमहा धान्य वितरित केले जात आहे. करोनात्या संकटात केंद्र सरकारतर्फे दरमहा मोफत धान्य दिले जात होते. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दरमहा दोनदा धान्य उपलब्ध होत होते. आता केंद्र सरकारने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत रेशन कार्डधारकांना दरमहा मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनतेला दरमहा मोफत धान्य उपलब्ध होणार आहे.
डिसेंबर दोन नियेतन व जानेवारी असे अंदाजे 47 हजार मेट्रिक टन धान्याचे वाटप केले जाणार आहे. या महागाईच्या काळात जनतेला दिलासा मिळणार आहे. मोफत धान्य वितरित करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाला सूचना मिळाल्या आहेत.
जानेवारीपासून वर्षभर मोफत धान्य
दरम्यान, या धान्य वाटपात डिसेंबर 2022 या महिन्यातील दोन व चालू जानेवारी महिन्यातील एक नियतन आहे. डिसेंबर महिन्यातील एक नियतनासाठी लाभार्थ्यांना पैसे द्यावे लागतील तर एक मोफत मिळेल. त्यानंतर मात्र जानेवारीपासून धान्य मोफत मिळणार असल्याचे सांगण्यात आले.





