Pune news : गुरुवारी दुपारनंतर अचानक झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने पुणे शहर अक्षरशः विस्कळीत झाले. शहरभर झाडे कोसळणे, पाणी साचणे आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मात्र या संकटकाळात वाहतूक नियंत्रणाऐवजी पोलिसांचा भर चलन वसुलीकडे असल्याचे चित्र समोर आले. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, सायंकाळी ६ वाजेपर्यंत झाडपडीच्या तब्बल ८२ घटना, पाणी शिरल्याच्या ६ घटना आणि सीमा भिंत कोसळल्याची १ घटना नोंदवण्यात आली. वानवडी, विद्यापीठ रस्ता, बाणेर, औंध, सिंहगड रोड, बिबवेवाडी, कोरेगाव पार्क, कात्रज, वारजे आणि पाषाण परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. Pune Rain, Pune या दुर्घटनांमध्ये सिंहगड रोड परिसरात झाड अंगावर पडून रंजना नवनाथ गिरी (६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या दत्तवाडी येथील रहिवासी असून फुलविक्रीचा व्यवसाय करत होत्या. पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने आणि रस्ते अडल्याने वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली. विशेषतः अलका चौक, झेड ब्रीज आणि मध्यवर्ती भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिक वाहतूक पोलिसांच्या मदतीची वाट पाहत असताना, अनेक ठिकाणी पोलीस अनुपस्थित असल्याचे दिसून आले. दरम्यान, अलका चौकात वाहतूक कोंडी शिगेला पोहोचली असताना झेड ब्रीजवर मात्र वाहतूक पोलीस वाहनचालकांना अडवून चलन (पावत्या) फाडण्यात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली २० अग्निशमन वाहने, २ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे १०० जवान रात्रभर मदतकार्य करत होते. सायंकाळपर्यंत ५२ ठिकाणांवरील काम पूर्ण करण्यात आले होते. एकीकडे आपत्तीमुळे शहर ठप्प झाले असताना, दुसरीकडे वाहतूक नियंत्रणाऐवजी चलन वसुलीवर भर दिल्याने प्रशासनाच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.