America : महागाईचा दर पगारवाढीपेक्षा अधिक.! अमेरिकन नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले
महागाई आणि पगारवाढ यांमधील ही तफावत फेब्रुवारी २०२३ नंतरची सर्वात मोठी ठरली असून, कामगारांची वास्तविक कमाई वर्षभरापूर्वीच्या पातळीपेक्षा ०.७% नी खाली आली आहे.

America – इंधनाच्या (गॅसोलीन) वाढत्या दरांनी अमेरिकन नागरिकांच्या वर्षभरातील पगारवाढीचा संपूर्ण लाभ हिरावून घेतला आहे. कामगार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात महागाईमध्ये वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ४.२% वाढ झाली. ही वाढ मे महिन्याच्या रोजगार अहवालातील सरासरी ताशी कमाईत झालेल्या ३.४% वाढीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहे.
महागाई आणि पगारवाढ यांमधील ही तफावत फेब्रुवारी २०२३ नंतरची सर्वात मोठी ठरली असून, कामगारांची वास्तविक कमाई वर्षभरापूर्वीच्या पातळीपेक्षा ०.७% नी खाली आली आहे.
चालू वर्षात सलग दुसऱ्यांदा पगारवाढीच्या वेगापेक्षा महागाईचा दर अधिक राहिला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर जागतिक बाजारात इंधनाचे दर कडाडले, जे या महागाईचे मुख्य कारण मानले जात आहे. (America)

America : महागाईचा दर पगारवाढीपेक्षा अधिक.! अमेरिकन नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले
या आर्थिक संकटामुळे अमेरिकन नागरिकांची महागाई-समायोजित वास्तविक कमाई जानेवारी २०२५ च्या पातळीवर आली आहे, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसची धुरा सांभाळली होती. बेरोजगारीचा दर कमी आणि शेअर बाजार तेजीत असला, तरी ग्राहकांचा आत्मविश्वास खालावला आहे.
‘एएए’नुसार, जूनमध्ये गॅसोलीनचा दर प्रति गॅलन ४.१५ डॉलर्सवर घसरून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी तो वर्षभरापूर्वीच्या ३.१२ डॉलर्सपेक्षा खूप जास्त आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांनी सांगितले की, प्रशासन नागरिकांसाठी ‘परवडणाऱ्या दरांचा’ अजेंडा पुढे रेटण्यासाठी प्रयत्नशील राहील.





