Mumbai Local Train Accident : मुंब्रा अपघाताची 3 गंभीर कारणं उघड; दरवाजात लटकणं ठरलं जीवघेणं

Mumbai Local Train Accident : ठाण्यातील मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये 13 प्रवासी रेल्वेतून खाली पडले आणि त्यापैकी चार जणांना या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात त्यावेळी घडला ज्यावेळी कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती.
प्रवासी अक्षरश: दारात लटकून जात होते. यावेळी 13 प्रवासी खाली पडले आणि 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ठाण्यातील एका 44 वर्षीय आयटी इंजिनिअरचाही मृत्यू झाला आहे.
मयूर शाह असे या आयटी इंजिनिअरचे नाव असल्याची माहिती आहे. डोंबिवलीत स्वप्नातील घर घेण्यासाठी निघालेल्या मयूरचा हात घसरला आणि त्याचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
यासह, स्टेशनरीमध्ये काम करणारे राहुल शाह, जीआरपीएफ जवान विकी मुख्यदल आणि दिवा येथील 28 वर्षीय राहुल गुप्ता यांचा समावेश आहे. ही दुर्घटना मुंब्रा स्टेशनजवळच्या धोकादायक वळणावर घडली आहे, या वळणावर अनेक वर्षांपासून तोडगा काढण्याची मागणी होत आहे. दरम्यान, यामागची तीन प्रमुख कारणं आता स्पष्ट झाली आहेत.
१. तीव्र वळण आणि उंचवटा
दिव्याहून मुंब्राकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर खाडीपुलाच्या पुढे तीव्र वळण आहे. त्यासोबतच पटरी शहराकडील एका बाजूने उंच आहे, त्यामुळे लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी आपसूकच मुंब्रा खाडीकडे झुकतात.
२. समोरून येणाऱ्या लोकलची टायमिंग
त्याच वेळी विरुद्ध दिशेने सीएसएमटीकडे जाणारी लोकलही आली. दोन लोकल समोरासमोर आल्याने दरवाजांतील अंतर फारच कमी झाले. उंचवट्यामुळे प्रवासी आधीच अधिक झुकलेले असल्याने समोरून आलेल्या लोकलला घासले.
३. खांद्यावरची सॅक आणि वेग
गर्दीत अनेक प्रवाशांच्या खांद्यावर सॅक असते. या बॅगमुळे हे प्रवासी आणखी ओढले गेले व बाहेर फेकले गेले. त्यात या वळणावर लोकलचा वेग कमी ठेवण्याच्या सूचना असूनही त्याचे पालन झाले नसल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.





