Mumbai Local Train Accident : गर्दी की लोखंडी रॉड? प्रवाशाच्या जबाबामुळे संशयाची दिशा बदलली”, नेमकं सत्य काय?

मुंब्रा : मुंबईतील मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी घडलेल्या लोकल ट्रेन अपघातामध्ये 13 प्रवासी खाली पडले. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सुरुवातीला हा अपघात ट्रेनच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगांमुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या प्रकरणात नवा, धक्कादायक पैलू समोर आला आहे.
मध्य रेल्वेच्या तपासात असे लक्षात आले आहे की, अपघातग्रस्त लोकलच्या शेवटच्या डब्यावर ओरखडे दिसून आले. यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये संशय निर्माण झाला आहे, ट्रेनला लोखंडी रॉडसारख्या अडथळ्याचा धक्का बसला असावा.
अपघातातून बचावलेला एका प्रवाशाने सांगितले की, “आम्हाला काहीतरी लागल्यासारखं जाणवलं आणि लगेच आम्ही खाली पडलो. भिंतीला धडकल्यासारखी जाणिव झाली होती.” या बयानामुळे हा अपघात नुसत्या गर्दीमुळे नव्हे, तर एका भौतिक अडथळ्यामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच दुसरी थिअरी सांगते की, अपघाताच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. अनेक प्रवासी दरवाज्यात, फुटबोर्डवर लटकले होते. समोरासमोरून येणाऱ्या दोन ट्रेनमधून प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून ते खाली पडल्याची शक्यता देखील तपासली जात आहे.
अपघातानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर आरपीएफ, जीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे अभियंत्यांनी दोन्ही ट्रेन ट्रॅकमधील अंतर मोजून तपास सुरू केला आहे. सध्या या मार्गावरून ये-जा करणाऱ्या लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या सावकाश वेगाने धावतात. रेल्वेच्या प्राथमिक चौकशीतून आता नेमकं सत्य काय समोर येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
“जास्त बोलण्याची गरज नाही” : अश्विनी वैष्णव
सोशल मीडियावर सक्रीय असणारे अश्विनी वैष्णव यांनी मुंबई अपघातात मृत्यू झालेल्यांबद्दल सांत्वन किंवा श्रद्धांजलीही सोशल मीडियावर वाहिलेली नाही. दिल्लीत सोमवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांना मुंबईतील दुर्घटनेबद्दल विचारण्यात आले. मात्र यावर त्यांनी अधिक बोलणे टाळले. रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील अपघाताबाबत पत्रक काढले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर जास्त बोलण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.
लोकलला बसणार स्वयंचलित दरवाजे; रेल्वे प्रशासनाचा निर्णय
आता रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. लोकलमधून अशा प्रकारच्या दुर्घटना घडून नयेत, त्यावर उपाय म्हणून लोकलमध्ये स्वयंचलित पद्धतीने बंद होणारे दरवाजे बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॅा. स्वप्नील नीला यांनी दिली आहे.





