Mumbai Local Train Accident : ठाण्यातील मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ घडलेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये 13 प्रवासी रेल्वेतून खाली पडले आणि त्यापैकी चार जणांना या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात त्यावेळी घडला ज्यावेळी कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. प्रवासी अक्षरश: दारात लटकून जात होते. यावेळी 13 प्रवासी खाली पडले आणि 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ठाण्यातील एका 44 वर्षीय आयटी इंजिनिअरचाही मृत्यू झाला आहे. मयूर शाह असे या आयटी इंजिनिअरचे नाव असल्याची माहिती आहे. डोंबिवलीत स्वप्नातील घर घेण्यासाठी निघालेल्या मयूरचा हात घसरला आणि त्याचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यासह, स्टेशनरीमध्ये काम करणारे राहुल शाह, जीआरपीएफ जवान विकी मुख्यदल आणि दिवा येथील 28 वर्षीय राहुल गुप्ता यांचा समावेश आहे. ही दुर्घटना मुंब्रा स्टेशनजवळच्या धोकादायक वळणावर झाली, ज्यावर अनेक वर्षांपासून तोडगा काढण्याची मागणी होत आहे. मृतांच्या कुटूंबीयांना 5 लाख रुपये जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून अपघातात ज्या 4 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटूंबीयांना मदत म्हणून आम्ही 5 लाख रुपये जाहीर केले आहेत. याशिवाय जखमींना 50 हजार, एक लाख किंवा दोन लाख रुपये दिले जातील. तसेच त्यांचा सर्व उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल. याशिवाय ज्युपिटरला जे दोन रुग्ण गंभीर आहेत, त्यांचा सर्व खर्च शासन करेल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. ‘बाहेरच्या लोंढ्यांमुळे मुंबईची अवस्था बिकट’ – राज ठाकरे मुंबईत बाहेरच्या राज्यातून येणारे लोंढे यामुळे मुंबईची अवस्था बिकट झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील रेल्वे दुर्घटनेनंतर तरी रेल्वे मंत्र्यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यातील शहरांची अवस्था बिकट झाली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मुंबईतील गर्दी नवीन नाही, अशा वेळी रेल्वेमंत्री काय करत आहेत? हा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘वाढती गर्दी मुख्य कारण’ – शरद पवार मध्य रेल्वेवर दररोज सरासरी ६ ते ७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार समोर आलेली ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी याचे मुख्य कारण असल्याचे सर्वज्ञात आहे. तरीही, असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही. केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. मध्य रेल्वेनेही वेळेचे उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्वांच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे, असे मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या अपघातानंतर मांडले. मोदी सरकार ११ वर्षे “सेवेचे” साजरे करत असताना, मुंबईहून आलेल्या दुःखद बातमीतून देशाचे वास्तव दिसून येते. भारतीय रेल्वे लाखो लोकांच्या जीवनाचा कणा आहे, परंतु आज ती असुरक्षितता, गर्दी आणि अराजकतेचे प्रतीक बनली आहे. सरकारने २०२५ बद्दल बोलणे थांबवले आहे आणि आता २०४७ ची स्वप्ने विकत आहेत. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो. – राहुल गांधी, विरोधीपक्षनेते काँग्रेस