खेड-शिवापूर (वार्ताहर) – पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे अडीच टक्के टोलवाढ करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून ही नवीन टोल दरवाढ लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे सातारा टोल रोड प्रशासनाकडून देण्यात आली.
दरवर्षी एप्रिल महिन्यात टोलचे दर बदलले जातात. त्यानुसार यावर्षीही टोलचे दर एप्रिलपासून बदलले जाणार आहे. यावर्षी पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलच्या दरात सुमारे अडीच टक्के टोलवाढ करण्यात आली आहे.
कार, जीप आणि हलक्या वाहनांसाठीच्या टोलच्या दरात ५ रुपयांची वाढ झाली असून नवीन दरानुसार या वाहनांना १२० रुपये टोल द्यावा लागणार आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांच्या टोलच्या दरातही ५ रुपयांची वाढ झाली आहे. या वाहनांना आता १९० रुपये टोल आकारला जाणार आहे. बस आणि ट्रकसाठी पूर्वी ३९० रुपये टोल दर होता. त्यात १० रुपयांची वाढ झाली असून आता बस आणि ट्रकसाठी ४०० रुपये टोल आकारण्यात येणार आहे.
जड वाहनांसाठी पूर्वी ४१५ रुपये टोल होता. आता त्यात ५ रुपयांची वाढ झाली असून जड वाहनांना आता ४२० रुपये टोल द्यावा लागणार आहे. अवजड वाहनांच्या टोल दरात १५ रुपयांची वाढ झाली आहे. नव्या टोल दरानुसार अवजड वाहनांसाठी ६३० रुपये टोल आकारण्यात येणार आहे.
याबाबत पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया म्हणाले, “दरवर्षी टोलचे दर बदलत असतात. त्यानुसार यावर्षीही एप्रिलपासून टोल दर बदलले असून टोल दरात सुमारे अडीच टक्के वाढ झालेली आहे.”
अशी राहील वाढ ,वाहने रुपये
-कार, जीप आणि हलक्या वाहनांसाठी ०५
– हलक्या व्यावसायिक वाहने ०५
– बस व ट्रकसाठी १०
– जड वाहने ०५
– अवजड वाहने १५