LPG Cylinder Crisis – पुणे–सातारा महामार्गालगत असलेल्या खेड शिवापूर परिसरात घरगुती गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅस वितरण केंद्रांवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळपासूनच नागरिक सिलिंडर मिळवण्यासाठी एजन्सीसमोर रांगेत उभे राहत असल्याने परिसरात मोठी गर्दी होत आहे. सध्या खेड शिवापूर परिसरात गॅसचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. काही ठिकाणी ग्राहकांना तास न तास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. घरातील दैनंदिन कामे सांभाळून गॅस मिळवण्यासाठी महिलांना एजन्सीसमोर ताटकळत थांबावे लागत आहे. काही ग्राहकांनी सांगितले की, गॅस सिलिंडरची बुकिंग करूनही वेळेवर सिलिंडर मिळत नाही. त्यामुळे घरातील स्वयंपाकाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. काही कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात लाकडी भट्टी किंवा इतर पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे. खेड शिवापूर परिसरातील गॅस एजन्सींमध्ये दररोज मर्यादित प्रमाणातच सिलिंडर उपलब्ध होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांना एकाच वेळी सिलिंडर देणे शक्य होत नसल्याचे एजन्सीकडून स्पष्ट करण्यात येत आहे. गॅस वितरण केंद्रांकडून मात्र पुरवठा साखळीत काही अडचणी निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल, असा दावा एजन्सी व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी दरम्यान, खेड शिवापूर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन घरगुती गॅस नियमित आणि पुरेसा पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.