नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी १४ आरोपींना अटक; तीन नवीन एफआयआर दाखल

नागपूर : नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात आणखी १४ जणांना अटक करण्यात आली असून, एकूण अटक केलेल्या आरोपींची संख्या १०५ वर पोहोचली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात १० अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तीन नवीन एफआयआर दाखल
१७ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगजेबाच्या कबरीबाबतच्या मागणीवरून विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) नेतृत्वाखाली निदर्शने झाली. या वेळी कुराणातील श्लोक लिहिलेले पत्रक जाळल्याची अफवा पसरल्यानंतर नागपूरच्या अनेक भागांत हिंसाचार उसळला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता तीन नवीन एफआयआर नोंदवले आहेत.
संचारबंदीबाबत लवकरच निर्णय
नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितले की, “शहरातील विविध भागांतून १४ जणांना अटक करण्यात आली असून, आणखी तीन एफआयआर दाखल झाले आहेत.” उच्चस्तरीय आढावा बैठक झाल्यानंतर शहराच्या काही भागांतील संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेतला जाईल.
हिंसाचारात ३३ पोलिस जखमी
नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिस भवनात घेतलेल्या बैठकीत पोलिस आयुक्तांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या दंगलीत तीन डीसीपी स्तराच्या अधिकाऱ्यांसह ३३ पोलिस जखमी झाले. मुख्य आरोपी फहीम खानविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१७ आरोपी पोलिस कोठडीत
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेल्या १७ जणांना २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य आणि आरोपींवरील प्राथमिक आरोप लक्षात घेऊन हा निर्णय दिला.
गृहमंत्री फडणवीस आज नागपुरात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज(22 मार्च) नागपुरात दाखल होणार आहेत. नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीस हे पहिल्यांदाच नागपुरात येत आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या या बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा आढावा घेतला जाणार आहे. सोबत हिंसाचारग्रस्त भागातील विद्यमान परिस्थितीची व उपायोजना संदर्भात मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.





