Imran Khan : इम्रान खान यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Imran Khan – पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने इम्रान खान यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अलिकडेच पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने केलेल्या आंदोलनाशी संबंधित ७ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ही कोठडी सुनावण्यात आली आहे.
अदियाला तुरुंगातच झालेल्या सुनावणीदरम्यान ही कोठडी सुनावण्यात आली. रावळपिंडीमध्ये २८ सप्टेंबर रोजी झालेल्या आंदोलनाशी संबंधित प्रकरणी खान याना ६ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येणार आहे.
दिनांक २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान नोंदवल्या गेलेल्या अन्य ६ प्रकरणांमध्ये इम्रान खान यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, ही पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. पीटीआयने केलेल्या आंदोलनाशी संबंधित ६ प्रकरणी इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. हिंसक घटना झालेल्या आंदोलनाचे आवाहन केल्याबद्दल खान यांच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाकिस्तान सरकारविरोधात निर्वाणीचा लढा देण्यासाठी इम्रान खान यांनी १५ नोव्हेंबर रोजी देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यानुसार २४ नोव्हेंबरला पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी इस्लामाबादेत निदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. दिनांक २४ नोव्हेंबरच्या आंदोलनाशी संबंधित ताज्या २८ प्रकरणांमध्ये आतापर्यंत इम्रान खान यांना अटक झालेली नाही.





