पुणे जिल्हा | भोर बस स्थानकात ११ नवीन लालपरी दाखल होणार

भोर, (प्रतिनिधी) – भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी राज्य शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भोर आगारात ११ नवीन एसटी बसेस (लालपरी) उपलब्ध होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभाग आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी व वेळोवेळी केलेला पाठपुरावा यामुळे भोर बस स्थानकात लवकरच ११ नवीन (लालपरी) बस उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
या मुळे भोर-पुणे, भोर-मुंबई, व बंद असलेल्या लांब पल्याच्या फेर्या पुन्हा नव्याने सुरू होतील. तसेच ग्रामीण, दुर्गम व डोंगरी भागात एस.टी.च्या फेर्या नियमित देता येणार आहेत.
आमदार संग्राम थोपटे म्हणाले, भोर विधानसभा मतदार संघ हा अती दुर्गम डोंगरी असून भोर आगारातील बसेस जुन्या झाल्या असून अनेकदा रस्त्यातच बंद पडतात. त्या मुळे विद्यार्थी आणि प्रवासी यांची गैरसोय होत होती.
ही गैरसोय दूर व्हावी या साठी मी २० बसेसची मागणी प्रस्तावित केली होती. मात्र, जिल्ह्याला २०० बसेस मंजूर झाल्या असून यात भोर साठी ११ बसेस मिवणार असून भोर आगारात आता ४८ बसेस उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचे आभार
भोर आगारास या वाहनांच्या उपलब्धतेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आ.संग्राम थोपटे यांनी आभार मानले आहेत.





