पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दहावीच्या परीक्षेत विज्ञान भाग एक या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा’ या प्रश्नाचे विद्यार्थ्यांनी ‘हेलियम’ किंवा ‘हायड्रोजन’ असे उत्तर लिहिले असल्यास या दोन्ही उत्तरांना गुण देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेतील विज्ञान भाग एक या पेपरच्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील हा संभ्रम लक्षात घेऊन दोन्ही उत्तरांना तूर्त गुण देणे उचित होईल, असे पत्र आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह राज्य मंडळाला दिले होते. त्यानंतर राज्य मंडळाने विषयतज्ज्ञांशी चर्चा केली आणि या प्रश्नाच्या उत्तराबाबत स्पष्टीकरण दिले आहेत.
यासंदर्भात पुणे विभागीय मंडळाने संबंधित विषयाच्या विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेतले. विषयतज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार दोन्ही भिन्न उत्तरांचा विचार करता आणि विद्यार्थी हिताच्या दृष्टीने या प्रश्नाचे उत्तर ‘हेलियम’ किंवा ‘हायड्रोजन’ लिहिले असल्यास ते ग्राह्य धरून गुण देण्यात यावे, असा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.