Abhishek Banerjee : न्यायव्यवस्थेवरील टीकेवरून कलकत्ता उच्च न्यायालयाने अभिषेक बॅनर्जींना फटकारले
एक लोकप्रतिनिधी आणि सुशिक्षित व्यक्ती यांना सर्वसामान्य अडाणी व्यक्तीप्रमाणे वागणूक देता येणार नाही, असे परखड निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Abhishek Banerjee – न्यायव्यवस्थेच्या एका भागावर कथितपणे आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एक लोकप्रतिनिधी आणि सुशिक्षित व्यक्ती यांना सर्वसामान्य अडाणी व्यक्तीप्रमाणे वागणूक देता येणार नाही, असे परखड निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
मात्र, या विधानांचा परिणाम बॅनर्जी यांच्या सुरक्षा कपात करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर होणार नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती कृष्ण राव यांच्या खंडपीठाने सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला आहे.
अभिषेक बॅनर्जी यांची सुरक्षा झेड प्लस श्रेणीतून कमी करून एक्स श्रेणीची करण्यात आली आहे. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या रिट याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.
यावेळी पश्चिम बंगाल सरकारने बॅनर्जी यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत केलेल्या विधानांवर आक्षेप घेतला. बॅनर्जी यांची ही विधाने न्यायालयाचा फौजदारी अवमान करणारी असून, न्यायालयाने याप्रकरणी स्वतःहून कारवाई सुरू करावी, अशी मागणी राज्य सरकारने केली.
राज्य सरकारतर्फे अतिरिक्त महाधिवक्ता बिल्वदल भट्टाचार्य यांनी मुलाखतीचा लिखित मसुदा आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राइव्ह न्यायालयात सादर केला. एका विद्यमान खासदाराने न्यायाधीशांचे नाव घेऊन केलेली टीका हा संवैधानिक संस्थेवरील हल्ला असून हा न्यायालय अवमान कायद्यांतर्गत येणारा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कृष्ण राव यांनी बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. बॅनर्जींच्या वकिलाला ते म्हणाले की तुमच्या अशिलाला विचारा की कोणते न्यायाधीश भाजपसोबत आहेत आणि कोणते नाहीत… ते इतके बुद्धिमान आहेत, तर त्यांनी याची यादी द्यावी, मी पाहतो, असे न्यायमूर्ती राव म्हणाले.
बॅनर्जी हे एक सुशिक्षित व्यक्ती आणि विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे त्यांना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वागणूक देता येणार नाही. तुमचे अशील तर न्यायाधीशांचा वार्षिक गोपनीय अहवाल लिहीत आहेत, असा टोलाही न्यायालयाने लगावला.






