Sahyadri Express : सह्याद्री एक्सप्रेस आता थेट मुंबईपर्यंत धावणार? प्रवाशांची जुनी मागणी पुन्हा ऐरणीवर…वाचा सविस्तर
Sahyadri Express : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील हजारो चाकरमान्यांच्या सोयीसाठी सह्याद्री एक्सप्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करण्याची मागणी.

Sahyadri Express – पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी सह्याद्री एक्सप्रेसचा विस्तार मुंबईपर्यंत करावा. तसेच महालक्ष्मी एक्सप्रेसला निरा स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे या दोन्ही गाड्यांना मोठी गर्दी असून, वेटिग लिस्टही दिवसेंदिवस वाढत आहे.
तिकिट उपलब्ध होत नसल्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून दररोज हजारो विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार आणि कामगार वर्ग विविध कामांसाठी पुणे आणि मुंबईला जातात. कोल्हापूर-पुणे मार्गावरील सह्याद्री एक्सप्रेस सध्या पुण्यापर्यंतच धावते. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना पुण्यात उतरून दुसरी गाडी पकडावी लागते.
यामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा वाया जातो. ही गाडी मुंबईपर्यंत विस्तारित केली तर प्रवाशांना थेट सेवा उपलब्ध होईल. तसेच रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी वाढ होईल. मुंबई-कोल्हापूर दरम्यानच्या महालक्ष्मी एक्सप्रेसला पुणे-सातारा दरम्यान एकही थांबा नाही. त्यामुळे या पट्ट्यातील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
निरा रेल्वे स्थानक हे भौगोलिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. बारामती, निरा, फलटण, सासवड या शहरांसह जवळील एमआयडीसी परिसरातील नागरिक या स्थानकावर अवलंबून आहेत. महालक्ष्मी एक्सप्रेसला निरा येथे थांबा मिळाल्यास मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना पर्याय मिळेल.
“सह्याद्री एक्सप्रेसचा विस्तार मुंबईपर्यंत करावा आणि महालक्ष्मी एक्सप्रेसला निरा येथे थांबा द्यावा या प्रमुख मागण्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याबाबतच्या उपाययोजना मुंबईतील रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत सुचविल्या. त्या तात्काळ पूर्ण व्हाव्या ही अपेक्षा.”
– चैतन्य जोशी विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य
वेटिंग कमी करण्यासाठी विस्तार हवा
सह्याद्री एक्सप्रेस (कोल्हापूर-पुणे-मुंबई) कोरोना काळात नियमित संचलनात नव्हती. गेल्या काही महिन्यांपासून ही गाडी पुन्हा सुरू झाली. मात्र, मुंबईतील प्लॅटफॉर्मची उपलब्धतेमुळे ही गाडी पुण्यापर्यंतचे धावते. कोल्हापूर-मुंबई प्रवासासाठी महालक्ष्मी एक्सप्रेसवर सध्या ३०० ते ४०० पेक्षा जास्त वेटिंग असते. ही गर्दी कमी करण्यासाठी सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत सुरू करणे हाच पर्याय असल्याचे समिती सदस्यांनीही बैठकीत सांगितले.





