Railway Update – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून मुंबई-कोल्हापूरसह अमरावती आणि नांदेडदरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून, पुणे, अमरावती, कोल्हापूर, सातारा, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि जळगाव, शेगाव आणि अकोला मार्गावरील प्रवाशांना सोयीचे झाले आहे. मुंबई-कोल्हापूर-मुंबई या विशेष गाडीच्या दोन फेऱ्या वाढविल्या असून, दि. २४ जानेवारी रोजी मुंबई येथून ही गाडी सोडण्यात आली. तर दि. २६ जानेवारी रोजी कोल्हापूर येथून दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, आठ शयनयान, चार सामान्य द्वितीय आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आहे. तर ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, मिरज आणि हातकणंगले आदी ठिकाणी थांबेल. तसेच, मुंबई-नांदेड-मुंबई गाडीच्या ४ विशेष फेऱ्या आणि अमरावती-पनवेल-अमरावती अनारक्षित विशेष दोन फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गाडी क्रमांक ०१४१५ दि. २६ जानेवारी रोजी पनवेल येथून सायंकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. या गाडीला कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला आणि बडनेरा आदी ठिकाणी थांबे आहेत. तरी या विशेष गाड्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.