Chakan MIDC : चाकण एमआयडीसीत विजेचा लपंडाव! वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने उद्योगांचे मोठे नुकसान
Chakan MIDC : चाकण एमआयडीसी टप्पा-२ मधील एमएसएमई उद्योगांना वारंवार होणाऱ्या वीज खंडितीचा फटका; उत्पादन प्रक्रियेवर परिणाम झाल्याने उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान.

Chakan MIDC – देशातील प्रमुख ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणार्या चाकण एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील टप्पा क्रमांक-2 मधील शेकडो लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) गेल्या काही महिन्यांपासून अनियमित वीजपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे उत्पादन प्रक्रिया विस्कळीत होत असून उद्योजकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
नवीन उद्योगांसाठी आकर्षक गुंतवणूक धोरणे जाहीर करणारे राज्य सरकार अस्तित्वातील उद्योगांना भेडसावणार्या पायाभूत सुविधा आणि वीज समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची तीव्र नाराजी उद्योगविश्वातून व्यक्त होत आहे. आखाती देशांतील संघर्ष, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती आणि मनुष्यबळाच्या तुटवड्यामुळे उद्योग आधीच अडचणीत असताना आता वारंवार होणार्या वीज खंडितीमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
तांत्रिक बिघाडाच्या अपवादात्मक कारणांव्यतिरिक्त फिडरवरील वाढत्या भारामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे सांगितले जात आहे. महावितरणचे उपअभियंता प्रकाश शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 मेगा व्होल्ट अॅम्पिअर (एमव्हीए) क्षमतेचे दोन नवीन फिडर उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरू असून ते कार्यान्वित होण्यासाठी किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
तात्पुरत्या उपाययोजनेअंतर्गत तौराल कंपनीसमोर नवीन केबल टाकून काही भार अन्य फिडरवर स्थलांतरित करण्यात आला आहे. उद्योजकांच्या म्हणण्यानुसार, फिडरवरील भार तब्बल 40 टक्क्यांनी वाढल्यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे. मात्र, युद्धपातळीवर उपाययोजना करण्याऐवजी संबंधित अधिकारी जबाबदारी फिडर ऑपरेटर आणि क्षेत्रीय कर्मचार्यांवर ढकलत असल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.
तसेच अनेकदा आपत्कालीन देखभाल किंवा सेफ्टी परमिटच्या नावाखाली कोणतीही पूर्वसूचना न देता तासन्तास वीजपुरवठा बंद ठेवला जातो. जाहीर करण्यात आलेल्या शटडाउनच्या वेळापत्रकाचेही पालन होत नसल्याने उद्योग क्षेत्रात संतापाचे वातावरण आहे.
उद्योजकांच्या प्रमुख तक्रारी
1. दिवसातून सरासरी पाच ते सहा वेळा फिडर ट्रिप होऊन वीजपुरवठा खंडित होतो.
2. अनधिकृत खोदाईमुळे केबल तुटणे, जंप तुटणे, फ्युज वितळणे यांसारखे प्रकार वारंवार घडतात.
3. विजेच्या दाबातील चढउतारामुळे यंत्रसामग्री जळण्याच्या घटना वाढल्या आहेत.
4. वीज गेल्यानंतर पुन्हा सुरू झाल्यावर मशीन कार्यान्वित होण्यासाठी 5 ते 10 मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे कामगारांना निष्क्रिय बसवून ठेवावे लागते.
5. उत्पादन प्रक्रिया वारंवार थांबल्याने उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.






