Power Cut Pune : महावितरणचा नागरिकांना शॉक! कडाक्याच्या उन्हात शहरातील ‘या’ भागात ६ तास वीजपुरवठा बंद
Power Cut Pune : घरून काम करणाऱ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप; दुरुस्तीच्या कामामुळे ऐन उन्हाळ्यात ६ तास वीज गुल.

Power Cut Pune : राज्यात उष्णतेची लाट तीव्र आली असून पुण्यातही तापमानाचा पारा ४२ अंशांच्या घरात पोहोचला आहे. यामुळे नागरिक आधीच उकाड्याने हैराण झाले असताना महावितरणने दुरुस्तीच्या कामासाठी उद्या, गुरुवारी (दि. १४) सिंहगड रस्ता परिसरातील अनेक भागांमध्ये तब्बल सहा तास वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार असून महावितरणच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महापारेषण या भागातील वेगवेगळी उपकेंद्र दुरूस्तीसाठी बंद ठेवणार आहेत. दुरुस्तीमुळे सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत हा वीजपुरवठा बंद असेल. विशेषतः नांदेड सिटी, नांदेड सिटी टाऊनशिपमधील नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे.महावितरणच्या माहितीनुसार नांदेड सिटी टाऊनशिप, वारजे टॉवर वर्क्स, राठी बेहरे परिसर, भुजबळ टाऊनशिप, इंद्रायणी कॉलनी, हॅपी कॉलनी, खराडे पाटील सोसायटी,
आनंदनगर, आरएमडी कॉलेज व स्कूल परिसर, श्रीराम सोसायटी आणि वसुधा इश्वरा या भागांतील वीजपुरवठा बंद राहणार आहे. उत्तमनगर, दांगट पाटील नगर, शिंदे पार्क, कोंढवे धावडे, रामनगर, गणपती माथा, अहिरे गाव, देशमुखवाडी आणि शिवणे परिसर प्रभावित असणार आहे. खडकवासला गाव, किरकटवाडी, कोळेवाडी, धायरी गाव, जे. पी. नगर, शिवणे गाव, धोंडे कॉर्नर तसेच आराचटी परिसरातील वीजपुरवठा बंद असेल.
दामाडी एरिया, आगम मंदिर परिसर, साई मायस्टिकव्ह्यू, के. बी. डेव्हलपर्स, अमित ब्लॉसमफिल्ड सोसायटी, आंबेगाव, जांभुळवाडी रोड, दल्लेनगर, सनब्राईट स्कूल परिसर, लिपाणे वस्ती, जांभुळवाडी तलाव, अथेन्सिया रॉयल सोसायटी, तक्षशिला सोसायटी या भागांनाही याचा फटका बसणार आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना घरात कूलर, पंखे, एसी आणि पाण्याच्या मोटारींवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा वेळी सकाळपासून दुपारपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रचंड उकाडा असताना नागरिकांना अशा प्रकारे वेठीस धरणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.






