Gokul Dudh Sangh : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना थेट फोन! गोकुळमध्ये सरकारचा गेम उलटा पडणार?
कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणाचा प्राण मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या (Gokul Dudh Sangh) सत्तेचा पेच आता स्थानिक सीमा ओलांडून थेट राज्याच्या राजकारणात धडकला आहे.

Gokul Dudh Sangh : कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणाचा प्राण मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघच्या (Gokul Dudh Sangh) सत्तेचा पेच आता स्थानिक सीमा ओलांडून थेट राज्याच्या राजकारणात धडकला आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनमताचा कौल मिळाल्यानंतरही सत्ता हस्तगत करण्यासाठी पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
दूध संघाच्या (Gokul Dudh Sangh) २५ जागांपैकी १३ जागांवर विजय मिळवून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, बहुमताचे स्पष्ट गणित असतानाही अध्यक्षपदाची निवड रोखण्यासाठी राज्य सरकारकडून चार शासननियुक्त संचालकांची खेळी खेळली गेली आणि सत्तेचे संपूर्ण समीकरणच अचानक उलटेपालटे झाले.
शासनाच्या या अजब आणि अनपेक्षित हस्तक्षेपामुळे सतेज पाटील यांनी थेट राज्य सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे. लोकशाही मार्गाने मिळालेला शेतकऱ्यांचा कौल चिरडण्याचा हा उघड प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी याविरोधात न्यायालयीन लढा तर उभारलाच आहे, पण त्याचबरोबर ९ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात भव्य संघर्ष मोर्चाची घोषणा करून रस्त्यावरील लढाईचीही तयारी केली आहे.
या निर्णयाने महायुतीतही अंतर्गत खदखद सुरू असून खुद्द शिंदे यांच्या शिवसेनेतील स्थानिक नेतेही या निर्णयावर प्रचंड नाराज असल्याची कुणकुण लागली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणात लक्ष घातल्याने हा संघर्ष राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.
या सर्व संघर्षाच्या केंद्रस्थानी असताना आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मैदानात उडी घेत सतेज पाटील यांना फोन लावला. “लोकशाहीचा गळा आवळणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या या लढाईत शिवसेना ठाकरे गट पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा आहे,” असा खंबीर विश्वास ठाकरे यांनी यावेळी दिला.
ठाकरे यांच्या या थेट पाठिंब्यामुळे कोल्हापूरच्या या सहकार युद्धाला (Gokul Dudh Sangh) आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे तीव्र राजकीय वळण मिळाले असून, आगामी संघर्ष मोर्चा आणि न्यायालयाचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.






