Pune ZP Election – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीसाठी हवेली तालुक्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून, पूर्व हवेलीतील मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जाणार याचा निर्णय आज मतदानाद्वारे मतपेटीत बंद होणार आहे. या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी 25 उमेदवार तर पंचायत समितीच्या बारा जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी जिल्हा परिषदेसाठी सहा व पंचायत समितीसाठी बारा उमेदवार दिले असून, खरी लढत या दोन प्रमुख पक्षांतच होत असल्याचे चित्र आहे. पूर्व हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) ने मोठी फौज मैदानात उतरवली असली तरी भाजपनेही प्रथमच तोडीस तोड उमेदवार देत ताकद दाखवली आहे. त्यामुळे यंदाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने मिळवलेल्या एकहाती सत्तेनंतर आता पूर्व हवेलीतही भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर पक्ष आमनेसामने आले आहेत. पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, थेऊर, कोरेगाव मुळ व पेरणे गटात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तुल्यबळ लढत होत असून, या गटांकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तर लोणी काळभोर गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट), भाजप, शिवसेना (शिंदे गट), बहुजन समाज पार्टी तसेच इतर उमेदवारांमध्ये बहुरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषद पुणे उरुळी कांचन, सोरतापवाडी, थेऊर, आव्हाळवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, केसनंद, कोरेगाव मुळ, लोणीकंद व पेरणे या सर्व गणांमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनीही जोरदार आव्हान उभे केले असून, आजच्या मतदानात मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट वाटपात काही निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने भाजपने त्यांना उमेदवारी देत राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. नाराज उमेदवार भाजपकडे वळल्याने पूर्व हवेलीत भाजपची ताकद यंदा लक्षणीयरीत्या वाढल्याचे बोलले जात आहे. भाजप पहिल्यांदाच पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्यामुळे निवडणुकीत कमालीची रंगत निर्माण झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात जोरदार मुकाबला अपेक्षित आहे.सर्व उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, आजच्या मतदानातून कुणाचा वरचष्मा राहतो हे स्पष्ट होणार आहे. उमेदवारांचा घराघरांत प्रचार उमेदवारांकडून मतदारांच्या थेट गाठीभेटी घेत घराघरांत प्रचार करण्यात आला आहे. गावोगावी तसेच वाड्या-वस्त्यांवर जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, तरुण मंडळे व छोट्या वाड्या-वस्त्यांमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही धनाढ्य उमेदवारांकडून आर्थिक व वस्तुरूप प्रलोभने दिली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. सर्वत्र ‘लक्ष्मी दर्शन’ घडत असल्याच्या चर्चा पूर्व हवेलीत ऐकायला मिळत आहेत.