प्रभात वृत्तसेवा पुणे – देशातील वेगाने वाढणाऱ्या विमानतळापैकी एक पुणे विमानतळ असून, २०२५ मध्ये येथून होणारी उड्डाणे आणि प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. वर्षात तब्बल एक कोटी आठ लाख साठ हजार प्रवाशांनी विमानतळावरून प्रवास केला असून, प्रवासी संख्या ६.१ टक्क्यांनी वाढले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासी-केंद्रित सुविधा, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सेवा गुणवत्तेवर दिलेल्या भरामुळे विमानतळाच्या विकासाला नवी दिशा मिळाली. पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल विकसित करून प्रवाशांसाठी सुविधा वाढवल्या आहेत. सध्या विमानतळवरून दररोज दोनशेहून अधिक विमांनाच्या फेऱ्या होत आहेत. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर काही नवीन शहर जोडली आहेत. प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा व शहरांसोबत वाढलेला हवाई कनेक्टमुळे प्रवासी संख्या वाढत आहे. गेल्या वर्षी पुणे विमानतळावरून एक कोटी दोन लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा प्रवासी संख्या सहा लाखांनी वाढल्याचे दिसून आले आहे. २०२४ मध्ये ६७ हजार ४८४ उड्डाणे झाली होती. ही संख्या २०२५ मध्ये वाढली असून यावर्षी ७० हजार ९९२ उड्डाणे नोंदवली गेली आहेत. उड्डाणांच्या संख्येत देखील ५.१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते. उड्डाणे वाढल्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. या वाढत्या प्रवाशांचे व्यवस्थापन करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने तांत्रिक आणि डिजिटल सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. डिजी यात्रासह ई-गेट्स, इनलाइन बॅगेज स्क्रिनिंग सिस्टीम, प्रवाह व्यवस्थापन प्रणाली आणि १०६ उड्डाण माहिती स्क्रीनमुळे प्रतीक्षा वेळ कमी झाली आहे. २०२५ मध्ये सर्व्हेत पुणे विमानतळाला ४.९२ ते ४.९६ असे गुण मिळाले असून जागतिक क्रमवारीत सुधारणा झाली आहे.