Maharashtra Kesari 2026 : पुण्यात रंगणार कुस्तीचा थरार! वाघोलीत १८ मार्चपासून ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन
Maharashtra Kesari 2026 : ४२ कुस्तीगीर संघांमधील मल्लांच्या लढती पाहण्याची कुस्तीप्रेमींना संधी; १८ मार्चला सायंकाळी होणार स्पर्धेचे उद्घाटन.

Maharashtra Kesari 2026 – भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या मान्यतेने, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने राष्ट्रीय तालीम संघ पुणे व रामकृष्ण कर्तव्य फाऊंडेशन वाघोली यांच्या सहकार्याने 18 ते 22 मार्च 2026 रोजी वाघोली येथे 68 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे उद्घाटन 18 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता होईल, तर बक्षीस वितरण समारंभ 22 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता होईल. महाराष्ट्रातील 42 शहर आणि जिल्हा कुस्तीगीर संघांमधून तब्बल 840 कुस्तीगीर गादी आणि माती विभागात सहभागी होणार आहेत. याव्यतिरिक्त, 100 तांत्रिक अधिकारी, 84 संघ व्यवस्थापक आणि 84प्रशिक्षकही या स्पर्धेत उपस्थित राहतील.
दरवर्षीप्रमाणे, दिवंगत पैलवान मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने ‘महाराष्ट्र केसरी’ किताब विजेत्यास चांदीची गदा प्रदान करण्यात येईल. तसेच, इतर सर्व प्राविण्यधारक कुस्तीगीरांना रोख बक्षिसे दिली जातील.
स्पर्धेतील सर्व कुस्तीगीर, तांत्रिक अधिकारी, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था रामकृष्ण कर्तव्य फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आली आहे. वाघोलीतील मैदानांची पाहणी कुस्तीगीर संघाच्या पदाधिकार्यांकडून करण्यात आली असून स्पर्धेचे मैदान लवकरच फायनल करून त्याठिकाणी स्पर्धा पार पडणार आहे.





