नेवासा – शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा खुर्द मुले येथील इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल झालेल्या पालकांनी पुढाकार घेऊन मिशन आपुलकी अंतर्गत उभारलेला ‘स्मार्ट टू डिजिटल क्लास’ हा आनंददायी शिक्षणासाठी मॉडेल क्लास ठरला असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी केले. मिशन आपुलकी अंतर्गत सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करत सुमारे दहा हजार रुपये ऑनलाईन जमले.
सोशल मीडियावर शिक्षक आठरे यांच्याशी जोडले गेलेले नेवासा फाटा येथील सॉफ्टवेअर इंजिनियर अमोल कोठारी यांनी स्मार्ट क्लासच्या भिंतीवर शैक्षणिक अभ्यासक्रम रेखाटून रंगरंगोटीसाठी पाच हजार रुपये मदत केली. यावेळी कोठारी यांचा शाळेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांच्या हस्ते सत्कार केला.आवाहनाला प्रतिसाद देत दहा हजार रुपये वर्गणी जमली. सुमारे जवळपास एक लाख लोकसहभाग जमवून डिजिटल टू स्मार्ट क्लास साकारला आहे.
‘डिजिटल टू स्मार्ट क्लास’ स्वप्न उराशी बाळगून त्याद्वारे प्रत्यक्षात पूर्णत्वास नेणारे अवलिया शिक्षक राहुल आठरे यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका पुष्पा ठुबे यांनी सर्वांचे स्वागत केले. यामध्ये इंग्रजी, मराठी भाषा व्याकरण, भौगोलिक, इतिहास, विज्ञान माहिती, व्यवाहारिक गणित इ.अभ्यासक्रम, महापुरुषांचे प्रेरणादायी विचार, विद्यार्थी प्रिय ऍनिमेशन प्राणी, कार्टून चित्रे यांचा समावेश आहे.
एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना गुगलच्या विविध सेवांचे लोगो, विविध आपत्कालीन हेल्पलाइन नंबर यांनी वर्ग भिंती रंगवल्या आहेत. यामुळे बोलक्या भिंती झाल्या आहेत. संगणक शिक्षण व डिजिटल क्लासरूम यामुळे विद्यार्थ्यांना यूट्यूबद्वारे अनेक गोष्टींची अनुभूती माहिती वर्गात देता येणार असल्यामुळे विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण वाढले.