ZP Election 2026: दशक्रिया विधी ठरतायत नेत्यांची राजकीय मैदाने; श्रध्दांजलीच्या नावाखाली नेत्यांची तासभर भाषणबाजी

प्रभात वृत्तसेवा
आळेफाटा – जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे सध्या दशक्रिया विधी म्हणजे राजकीय नेत्यांच्या भाषणबाजीची केंद्रे बनल्याने, उपस्थित नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तालुक्यात बहुतांश गावच्या दशक्रियेत श्रध्दांजली वाहणाऱ्यांची संख्या आठ-दहापेक्षा कमी नसते. मोठ्या संख्येने भाषणबाजी करत श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांची संख्या असेल तर उपस्थितांचे (त्यातही उन्हात बसलेल्या) हाल होतात.
वेळेचे भान न राखता ही मंडळी श्रध्दांजलीच्या नावाखाली लांबलचक भाषणबाजी करतात. श्रद्धांजलीपर दोन शब्द बोलणे अपेक्षित असताना, काकस्पर्श झाल्यानंतर तासभरापेक्षा जास्त वेळ या मंडळींची भाषणबाजी सुरूच राहते. दशक्रियेसाठी जमलेल्या आयत्या गर्दीचा फायदा ही मंडळी प्रसिध्दीसाठी करतात.अनेकदा या मंडळींना मृत व्यक्तीच्या जीवनाबद्दल माहिती नसतानाही भरभरून बोलतात,
तर कधी उपस्थित राजकीय विरोधकांची उणीदुणी काढण्याचे तसेच एकमेकांना टोमणे मारण्याचे किस्सेही घाटावर घडतात. त्यामुळे घाटाचा वापर राजकीय व्यासपीठासारखा होऊ लागला आहे. भाषणबाजीमुळे दशक्रिया विधीचा मूळ उद्देशच दुर्लक्षिला जात असून वेळेचे भान न पाळल्याने विधीचे पावित्र्य सुध्दा हरवले जात असल्याची, संतप्त प्रतिक्रिया वयोवृद्ध मंडळींकडून व्यक्त होत आहे.
लोकांचा वेळ नाहक वाया जातो, घाटावर आलेली बहुतांश मंडळी शेतकरी आहेत, याचेही भान बोलण्याच्या नादात राहत नाही.शेतकऱ्यांसाठी सकाळची वेळ अत्यंत महत्वाची असते. मात्र सकाळी आठ वाजता सुरू होत असलेले दशक्रिया विधी भाषणबाजीमुळे कमीतकमी दहा वाजेपर्यंत लांबते. यात गैरहजर असलेल्या खासदार, आमदार व अन्य लहानमोठ्या राजकीय पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन मी त्यांच्या फार जवळचा आहे.
असे दाखवण्यासाठी त्यांच्यावतीने शोक व्यक्त करीत, श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या ‘कार्यकर्त्यांची’ जणू स्पर्धाच लागलेली असते.दरम्यान दशक्रियेसाठी बोलणाऱ्या वक्त्यांची संख्या मर्यादित ठेवण्याबाबत गावागावांच्या ग्रामस्थांच्या बैठकीत ठराव करुन पुढाकार घेतला पाहिजे. तरच भाषणबाजीला आळा बसेल असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.





