Junnar Crime : जुन्नर हादरलं! शिवसेनेच्या नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा; भररस्त्यात महिलेला अडवून..पाहा काय घडलं?
Junnar Crime : राजकीय सुडापोटी मला अडकवलं जातंय; विनयभंगाचे आरोप शिवसेनेच्या नेत्याने फेटाळले, जुन्नर तालुक्यात चर्चांना उधाण.

Junnar Crime – शिवसेनेचे बेल्हे येथील कार्यकर्ते आणि बेल्हे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक मोहन बाळशिराम बांगर यांच्याविरोधात विनयभंग आणि दमदाटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे बेल्हे परिसरासह जुन्नर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आळेफाटा पोलीस ठाण्यात एका ५१ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये हा गुन्हा (क्र. ८७/२०२६) नोंदवला आहे.
घटनेच्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी महिला बांगरवाडी येथून बेल्हे येथे स्कुटीवरून जात होत्या. यावेळी बेल्हे बायपास रस्त्यावर एका पांढऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना अडवले. गाडीतून उतरलेल्या मोहन बांगर यांनी महिलेशी वाद घालून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली, तसेच आक्षेपार्ह वक्तव्य करून गैरवर्तन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या महिलेने तातडीने आळेफाटा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
यापूर्वीही मोहन बांगर यांच्यावर एका गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार थोरात यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास गोसावी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या आरोपांबाबत मोहन बांगर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय सुडापोटी माझ्यावर अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.





