Dilip Walse Patil : वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचविण्यास प्राधान्य द्या; दिलीप वळसे पाटलांचा नवनिर्वाचित सदस्यांना कानमंत्र
Dilip Walse Patil : पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची शिवाजीनगरमध्ये महत्त्वाची बैठक; ६ मार्च रोजी जिल्हा बँकेच्या सभागृहात गटनेत्याची निवड होणार.

Dilip Walse Patil – जिल्हा परिषदेचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता आला पाहिजे. रस्ते आणि इतर बांधकामांच्या कामांमुळे मते मिळविण्याचे दिवस आता गेले आहेत. जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचविता येतील, यावर प्राधान्याने काम केले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात रविवारी आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सुनील शेळके, ज्ञानेश्वर कटके, शंकर मांडेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, अतुल बेनके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, विठ्ठल शिंदे, संभाजीराव होळकर आदी उपस्थित होते.
अजित दादांनी घालून दिलेल्या मार्गावर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर पुढे जायचे आहे. आम्ही मंत्रिमंडळात असलो, तरी सर्व निर्णय घेण्याचा अधिकार दादांकडेच होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जसे सांगतील, तसे पक्ष पुढे नेण्याचे काम करायचे आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. गट स्थापन करण्यासाठी ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पुणे जिल्हा बँकेच्या सभागृहात बैठक होणार आहे. गटनेता आणि अध्यक्ष कोणाला करायचे, हे सुनेत्राताई सर्वानुमते ठरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्ष सोडून आघाडी नको
वळसे पाटील म्हणाले, यश मिळणे, पद मिळणे किंवा पद न मिळणे यावरून राग-रुसवे होता कामा नयेत. जिल्ह्यात पक्षाची संघटना मजबूत असली पाहिजे. तालुका स्तरावरील निवडणुकांत पक्ष सोडून इतर कोणाशी आघाडी- युती करू नका. त्यामुळे पक्षाची ताकद कमकुवत होईल. काही अडचणी असतील तर ९ तारखेपूर्वी सोडवाव्यात. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे स्वप्न पाहण्यापूर्वी आपल्या तालुक्यातील सभापती आपल्या विचारांचा होणार आहे का, हे पाहावे, असेही त्यांनी सांगितले.





