ZIM vs AFG : झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय! तब्बल 12 वर्षांनंतर केला ‘हा’ खास पराक्रम

ZIM vs AFG Zimbabwe Historic Test Victory : हरारे येथील रोमांचक कसोटी लढतीत झिम्बाब्वेने अफगाणिस्तानवर एक डाव आणि 73 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा सामना झिम्बाब्वेच्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. झिम्बाब्वेने यापूर्वी केवळ दोन वेळा डावाने विजय मिळवला होता, आणि हा त्यांचा तिसरा असा पराक्रम आहे. या विजयाने झिम्बाब्वेने आपल्या घरच्या मैदानावर तब्बल 12 वर्षांनंतर कसोटी सामना जिंकला, ज्यामुळे चाहते आणि क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
अफगाणिस्तानचा पहिला डाव फक्त 127 धावांवर गारद –
हरारे येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानला झिम्बाब्वेच्या गोलंदाजीपुढे घुडगे टेकावे लागले. त्यांचा पहिला डाव अवघ्या 127 धावांवर आटोपला. रहमानुल्ला गुरबाजने सर्वाधिक 37 धावा केल्या, परंतु इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी या डावात आपला दबदबा राखला.
झिम्बाब्वेचा भक्कम डाव, बेन करनचे शतक –
प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने दमदार फलंदाजी करत 359 धावांचा डोंगर उभारला. बेन करनने 121 धावांची शानदार खेळी साकारली, तर सिकंदर रझाने 65 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या भक्कम धावसंख्येमुळे झिम्बाब्वेने सामन्यावर मजबूत पकड मिळवली.
हेही वाचा – Gautam Gambhir : काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांचा गौतम गंभीरवर खळबळजनक आरोप; म्हणाल्या…
अफगाणिस्तानचा दुसरा डावही गडगडला –
अफगाणिस्तानच्या दुसऱ्या डावातही झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी आपली कमाल दाखवली. अफगाणिस्तानचा दुसरा डाव 159 धावांवर संपुष्टात आला. इब्राहिम झादरानने 42 आणि बशीर शाहने 32 धावा करत काहीसा प्रतिकार केला, परंतु झिम्बाब्वेच्या पहिल्या डावापुढे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. परिणामी, जिम्बाब्वेने डावाने आणि 73 धावांनी हा सामना खिशात घातला.
झिम्बाब्वेचा ऐतिहासिक पराक्रम –
हा विजय झिम्बाब्वेच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. यापूर्वी 1995 मध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानला एका डावाने आणि 64 धावांनी, तर 2021 मध्ये बांगलादेशला एका डावाने आणि 32 धावांनी पराभूत केले होते. विशेष म्हणजे, झिम्बाब्वेने तब्बल 12 वर्षांनंतर आपल्या घरच्या मैदानावर कसोटी विजय मिळवला आहे. यापूर्वी 2013 मध्ये त्यांनी बांगलादेशविरुद्ध घरी विजय मिळवला होता.
हेही वाचा – IND vs AUS : रोहितला दुसऱ्या वनडेतून डच्चू? जैस्वालला मिळणार संधी! VIDEO व्हायरल झाल्याने चर्चेला उधाणं
झिम्बाब्वे क्रिकेटसाठी नवे प्रेरणास्थान –
या विजयाने झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावला असून, घरच्या मैदानावरील क्रिकेटच्या स्तरातही सुधारणा दिसून येत आहे. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, झिम्बाब्वे क्रिकेटच्या भविष्यासाठी ही विजय एक नवीन प्रेरणा ठरेल, यात शंका नाही.





