Zilla Parishad Elections | शिक्रापूर गटात कोणत्या पक्षाकडून कोण उतरणार रिंगणात?

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – जिल्हा परिषदेच्या निवडणुका अनेक दिवसांपासून रखडलेल्या असताना नुकत्याच निवडणुका जाहीर झाल्या असून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटांची आखणी झाली असून आरक्षण जाहीर होणे बाकी आहे. आता शिक्रापूर – सणसवाडी जिल्हा परिषद गटातून कोण उमेदवार असणार? कोणत्या उमेदवाराचा पक्ष कोणता असणार? याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
शिक्रापूर – सणसवाडी जिल्हा परिषद गटात शिक्रापूर, कासारी, सणसवाडी, कोरेगाव भीमा, वाडा पुनर्वसन ही गावे असून सध्या या गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कुसुम मांढरे या गटाचे प्रतिनिधित्व करत असताना राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तत्कालीन आमदार अशोक पवार यांच्यावर नाराज होऊन कुसुम मांढरे यांचे पती आबाराजे मांढरे यांनी अजित पवारांसोबत राहून जिल्हा परिषद गटात पकड कायम केली आहे.
तर याच गटातील पंचायत समितीच्या माजी सभापती मोनिका हरगुडे यांनी महिलांच्या विविध योजना पुढे आणत जिल्हा परिषद गटात भेटी सुरू केल्या आहेत. या गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले आमदार बापूसाहेब पठारे यांचे भाचे व जावई माजी सरपंच राहुल गव्हाणे यांनी तीन वर्षांपासून कोरेगाव, शिक्रापूर व सणसवाडी येथे ठिकठिकाणी नागरिकांच्या गाठीभेटी घेत युवकांची फळी तयार केलीनाअहे.
कुसुम मांढरे, मोनिका हरगुडे व राहुल गव्हाणे प्रत्येकजण उच्चशिक्षित असल्याने नागरिकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण दृढ असून ते आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. नुकतेच राहुल गव्हाणे यांनी जिल्हा परिषद गटात मोठी आखाड पार्टी करून अनेक आजी माजी आमदारांना त्या कार्यक्रमाला बोलावून उमेद्वारीचे रणशिंग फुंकले आहे. सध्या शिवसेना तालुकाध्यक्ष व शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे व त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी जिल्हा परिषद गटातील गणेशोत्सव मंडळांना भेटी, देणग्या देत आपले वलय निर्माण केले आहे.
या गटातून जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, जिजामाता बँकेचे संचालक आबाराजे मांढरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब खैरे यांचे चिरंजीव रोहित खैरे, माजी सदस्य रोहिणी सासवडे या देखील ऐनवेळी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये आमदार ज्ञानेश्वर कटके व माजी आमदार अशोक पवार यांची भूमिका महत्वाची असताना शिक्रापूर – सणसवाडी जिल्हा परिषद गटातून कोण उमेदवार असणार? कोणत्या उमेदवाराचा पक्ष कोणता असणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधलेले आहे.
हे असू शकतात निवडणूकिच्या रिंगणात..
शिक्रापूर जिल्हा परिषद गटात असलेल्या शिक्रापूर व सणसवाडी पंचायत समिती गणातून यापूर्वी माजी सभापती मोनिका हरगुडे व माजी उपसभापती जयमाला जकाते यांनी सभापती व उपसभापती पदांची धूरा सांभळली होती. आता पंचायत समितीसाठी भाजपाकडून राजेंद्र मांढरे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी सरपंच आबासाहेब करंजे, कासारीचे माजी सरपंच संभाजी भुजबळ, कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे, सणसवाडीच्या माजी सरपंच सुनंदा दरेकर रिंगणात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





