पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ विधानावर झेलेन्स्की नाराज ; म्हणाले,”हे आधी…”

Zelensky on PM Modi। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ल्याच्या वृत्तांवर चिंता व्यक्त केली. यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात एकच गोंधळ उडाला. कारण पंतप्रधानांच्या या प्रतिक्रियेवर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्ती केली आहे. आता भारतावर टीका केली आहे. युक्रेनने हे आरोप फेटाळून लावत म्हटले आहे की त्यांनी असा कोणताही हल्ला केला नाही.
दरम्यान, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. झेलेन्स्की म्हणाले की, पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा निषेध करणाऱ्या भारतासह काही देशांनी आमच्या मुलांवरील हल्ल्यांबद्दल कधीही बोलले नाही.
झेलेन्स्की भारताबद्दल काय म्हणाले ? Zelensky on PM Modi।
कीव इंडिपेंडेंटमधील वृत्तानुसार, झेलेन्स्की यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, भारत, युएई आणि काही इतर देशांनी पुतिन यांच्या निवासस्थानावर आमच्या कथित ड्रोन हल्ल्यांचा निषेध केला हे गोंधळात टाकणारे आणि वाईट आहे, जे कधीही घडले नाही.” ते पुढे म्हणाले की, इतके दिवस ते (रशिया) आमच्या मुलांवर हल्ला करत आहेत आणि लोकांना मारत आहेत, तरीही कोणीही त्याचा निषेध करत नाही. “खरं सांगायचं तर, मला भारताकडून किंवा युएईकडून हे ऐकायला मिळालेले नाही.”
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता
२९ डिसेंबर रोजी रशियाने दावा केला की युक्रेनने नोव्हगोरोड प्रदेशातील राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानावर ९१ ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये लिहिले की राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याच्या वृत्तांमुळे त्यांना खूप चिंता आहे. त्यांनी पुढे म्हटले की राजनैतिक प्रयत्न हा शत्रुत्व संपवण्याचा आणि शांतता प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यांनी सर्व पक्षांना शांतता उपक्रमांना कमकुवत करू शकणारी पावले उचलण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहनही केले.
युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी काय म्हटले ? Zelensky on PM Modi।
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री त्सिबिहा यांनी सांगितले की कीव भारत, युएई आणि पाकिस्तानने केलेल्या विधानांमुळे निराश आणि चिंतित आहे. इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये त्सिबिहा यांनी म्हटले की जवळजवळ एक दिवस उलटून गेला आहे आणि रशियाने पुतिन यांच्या निवासस्थानावरील कथित हल्ल्याचा कोणताही विश्वासार्ह पुरावा अद्याप दिलेला नाही आणि ते देणार नाहीत. कारण असा कोणताही पुरावा नाही. असा कोणताही हल्ला झाला नाही.





