Zakia Jafri : काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांचे निधन

अहमदाबाद : काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांचे शनिवारी निधन झाले. त्यांनी अहमदाबाद येथे वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २००२ च्या गुजरात दंगलींमध्ये झाकिया जाफरी यांचे पती एहसान जाफरी यांचे निधन झाले होते.
२८ फेब्रुवारी २००२ रोजी अहमदाबादमधील मुस्लिम वस्ती असलेल्या गुलबर्ग सोसायटीमध्ये मारल्या गेलेल्या ६९ लोकांमध्ये एहसान जाफरी यांचा समावेश होता. गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांना आग लावण्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली. अयोध्येहून परतणाऱ्या ५९ कारसेवकांना या ट्रेनमध्ये जाळून मारण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये भयंकर दंगली उसळल्या होत्या.
झाकिया जाफरी राष्ट्रीय स्तरावर खूप चर्चेत राहिल्या आहेत. गोध्रा ट्रेन जाळण्याच्या घटनेनंतर झालेल्या दंगलीच्या मोठ्या कटासाठी वरिष्ठ राजकीय नेत्यांना जबाबदार धरण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढाई लढली. झाकिया जाफरींच्या मुलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांच्या आईच्या निधनाची बातमी दिली.
सर्वोच्च न्यायालयात झाकिया जाफरी यांच्या निषेध याचिकेत सह-तक्रारदार असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड म्हणाल्या की, मानवाधिकार समुदायाच्या दयाळू नेत्या झाकिया आपा यांचे अवघ्या 30 मिनिटांपूर्वी निधन झाले! त्यांच्या दूरदर्शी उपस्थितीची उणीव संपूर्ण देश, कुटुंब, मित्र आणि जगाला जाणवेल!





