Yugendra Pawar: बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार? सोमेश्वरच्या निवडणुकीबाबत युगेंद्र पवारांचे महत्त्वाचे संकेत
Yugendra Pawar: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निंबूत येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा.

Yugendra Pawar – सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने निवडणूक रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि मतांचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिली.
निंबूत येथील युगवीर गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. युगेंद्र पवार म्हणाले की, ही प्राथमिक बैठक असून कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्याचा उद्देश होता. बहुतांश कार्यकर्त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पक्षाने पूर्ण ताकदीने लढवावी, अशी ठाम भूमिका मांडली आहे.
सर्वांचे मत विचारात घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. मेळाव्यात कार्यकर्त्यांनीही आगामी निवडणुकीत पक्षाने सक्षम पर्याय उभा करावा, अशी एकमुखी मागणी केली. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गट कोणती भूमिका घेणार, याकडे सभासदांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस गट संपर्क अभियानातून कारखान्याच्या कामकाजाची माहिती सभासदांपर्यंत पोहोचवत आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना अंतर्गत बैठका घेऊन संभाव्य उमेदवारांची चाचपणी करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्याने सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.





