पुणे : युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या वतीने कै. डॉ. बी. एन. देशपांडे व डॉ. विनोद डोंबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकद्वारे नोव्हेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बीएएमएस परीक्षेत उत्तीर्ण तसेच संस्थेच्या मोफत UPSC, MPSC मार्गदर्शन व शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम हडपसर, पुणे येथील टेरिटरी रेस्टॉरंट येथे संपन्न झाला. यावेळी बीएएमएस अंतिम परीक्षेत विद्यापीठात प्रथम तीन क्रमांक मिळवणारे डॉ. काथार तेजस, डॉ. खडकीकर आदिती आणि डॉ. साक्षी राठोड यांचा तसेच विविध विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या डॉ. अश्विनी पैठाणे (कायचिकित्सा) आणि डॉ. खडकीकर आदिती (शल्यतंत्र) यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली UPSC परीक्षेत यश मिळवलेल्या सोहम तेबरीवाल, शुभम थिटे, मंगेश खिलारे, प्रितेश बाविस्कर यांचा तसेच MPSC परीक्षेत यश संपादन केलेल्या विनय पवार, धनंजय घुले, . किशोरी घोरपडे आणि मंगेश सुरुशे यांचा गौरव करण्यात आला. CAPF परीक्षेत यश मिळवलेल्या अक्षय कारंडे, तुषार जाधव, ओंकार शिंदे आणि PSI परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तुषार खेतमाळीस व अजित पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयुष मंत्रालयाचे सल्लागार वैद्य मनोज नेसरी, निवृत्त पोलीस महासंचालक प्रबोध कुमार, IAS अधिकारी सागर डोईफोडे, डॉ. महेश दळे, IPS अधिकारी डॉ. केतन पाटील, सागर खरडे, राज देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या कार्याचे कौतुक केले. वैद्य मनोज नेसरी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी असे कार्यक्रम गरजेचे असल्याचे सांगितले. निवृत्त पोलीस महासंचालक प्रबोध कुमार यांनी संस्थेच्या कार्याचा विस्तार पंजाब व हरियाणा राज्यांत करण्याचा मानस व्यक्त केला. IAS अधिकारी सागर डोईफोडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांनी समाजासाठी योगदान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रम गायकवाड यांनी युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी UPSC व MPSC विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन व आर्थिक मदतीबाबत माहिती दिली. संस्थेच्या उपक्रमांमुळे आतापर्यंत २६ प्रशासकीय अधिकारी घडल्याचा त्यांनी उल्लेख केला. युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या वतीने ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रबोध कुमार यांची चीफ मेंटॉर म्हणून निवड करण्यात आली असून, प्राची देशपांडे, डॉ. ज्योती डोंबे, डॉ. सूरज इंगोले यांची संस्थेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे विश्वस्त डॉ. समीर ननावरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. कल्पेश वाणी, रोहन बोरसे, डॉ. सोनल भालेराव, डॉ. पुस्तके, डॉ. प्रशांत पाटील तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. निशिगंधा अभंग यांनी केले.