लाहोर – आपल्याच कुटुंबातील चौघांची हत्या केल्याबद्दल पाकिस्तानातील न्यायालयाने आज एका युवकाला तब्बल १०० वर्षांची शिक्षा सुनावली. आई, बंधू आणि दोन बहिणींची हत्या केल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. ऑनलाईन पब्जी खेळण्यावरून झालेल्या भांडणानंतर या युवकाने आपल्या घरातील चारही सदस्यांची हत्या केली होती. ही घटना २०२२ मध्ये घडली होती. लाहोरमधील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रियाझ अहमद यांनी हत्येच्या ४ प्रकरणी या १७ वर्षीय युवकाला १०० वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच्यावर ४ दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठाठावण्यात आला आहे, असे न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. आरोपीच्या वयामुळे त्याला जन्मठेपेच्या ४ शिक्षा देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जन्मठेपेसाठी त्याला २५ वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. हा आरोपी लाहोरमधील काहना या दाट लोकवस्तीच्या भागातील रहिवासी आहे. गुन्हा केला तेंव्हा हा युवक १४ वर्षांचा होता. त्याला पब्जी खेळण्याचे वेड लागले होते. तो त्याच्या खोलीमध्ये तासनतास पब्जी खेळत बसलेला असायचा. वेळ वाया घालवत असल्याबद्दल त्याची आई नाहिद मुबारक यांनी त्याला ताकिदही दिली होती. पब्जीमधील टार्गेट गाठू न शकल्याने तो नेहमी आक्रमक व्हायचा. २०२२ मध्ये एकेदिवशी त्याला आपले टार्गेट गाठता आले नाही. त्यातच त्याची आई रागावली. त्यामुळे रागावलेल्या युवकाने आईचे पिस्तुल घेऊन झोपलेली आई , २ बहिणी आणि भावाची गोळ्या घालून हत्या केली होती. या युवकाने आपला गुन्हा कबूल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.