Crime News : आळंदीत तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण
Crime News : ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी एका इसमाला जबरदस्तीने किडनॅप केले.

आळंदी : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचे जबरदस्तीने अपहरण करून त्याला अज्ञात ठिकाणी नेत लोखंडी रॉड, लाकडी दांडके व बेल्टने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा कान कापून आणि दात पाडून त्याला मृत समजून आरोपींनी रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. मात्र, आळंदी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांत मोशी परिसरातून तिन्ही आरोपींना ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत.
११ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी एका इसमाला जबरदस्तीने किडनॅप केले. त्याला अज्ञात ठिकाणी नेऊन लोखंडी रॉड, लाकडी दांडके, कमरेचा बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. मारहाणीत तरुणाचे दात पडले, डोक्यात गंभीर जखमा झाल्या, तसेच आरोपींनी कानावर वार करून कान कापल्याचे तपासात उघड झाले. तरुण मयत झाल्याचे समजून आरोपी त्याला रस्त्याकाठी टाकून पसार झाले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपआयुक्त मारुती जगताप, साहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजनकर, सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके, गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस निरीक्षक कसबे आणि सहायक पोलीस निरीक्षक सुनील वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे तातडीने फिरवण्यात आली.
डीबी पथकाचे (गुन्हे शोध पथक) प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राहुल दूधमल यांच्या नेतृत्वाखाली हवालदार फुले, दोडके आणि अमंलदार डिखले, डुमनार, सूर्यवंशी, नरवाडे व सातपुते यांच्या पथकाने आरोपींच्या मोबाईल लोकेशनसह सीडीआर, एसडीआर आणि परिसर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे रात्रभर विश्लेषण केले. अचूक तपासाच्या आधारे आरोपींचा ठावठिकाणा मोशी येथे असल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी रातोरात छापा मारून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा शोध घेऊन त्याला तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर वेळेत वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. अत्यंत गंभीर गुन्ह्यात दाखवलेली तत्परता आणि धडाडीमुळे आळंदी पोलिसांच्या डीबी पथकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.





